कृषीसह सर्वच क्षेत्राच्या वीज वापरांच्या दरांमध्ये करण्यात आली आहे वाढ
महागाईपाठोपाठ वीज बिलामुळे चाळीसगाव तालुक्यात जनता हैराण
चाळीसगाव – अनेक दिवसांपासुन डीझेल पेट्रोल व महागाईने जनता त्रस्त असताना या पाठोपाठ आता वीजवितरण कंपनीने विज बिलामध्ये चालू महिन्यात वाढ करून ग्राहकांना एकप्रकारे विजेचा धक्का दिला आहे. यामुळे वीज ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. एकीकडे विज बिले लवकर मिळत नाही वाढीव व चुकीचे बिल येतात त्यातच अचानक विज दरात वाढ झाल्याने चाळीसगाव तालुक्यातील ग्राहक विजग्राहक चिंतातूर झाले आहेत.
असे आहेत पुर्वीच दर
चाळीसगाव तालुक्यात घरगुती, औद्योगिक, वाणीज्य असे विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वीज ग्राहक आहेेत. या वीजग्राहकांना आता वाढीव वीजबिलाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यात कृषी क्षेत्रात 3 रुपये 35 पैसे युनिट, घरगुतीसाठी 0 ते 100 युनिटपर्यंत 5 रुपये 7 पैसे व 101 ते 300 युनिटसाठी 8 रुपये 74 पैसे, औद्योगिकसाठी 8 रुपये 4 पैसे तर वाणिज्यसाठी 13 रुपये 47 पैसे तर छोट्या उद्योगांसाठी 7 रुपये 83 पैसे दर होते. मात्र 1 सप्टेंबरपासून महाराष्ट्र वीजनियामक आयोगाने सन 2018 ते 2020 चा कालावधीतील राज्यातील घरगुती कृर्षी व औद्योगिक विजेचे नवीन दर जाहीर केले आहे. हे दर सन 2018, सन 2019 साठी महाराष्ट्र विज वितरण कंपनीकडुन लागु करण्यात आले आहे.
अशी झाली आहे वाढ
कृषी क्षेत्रातील वीजदरात वाढ होऊन 3 रुपये 55 पैसे, घरगुती साठी 0 ते 100 युनिटपर्यंत 5 रुपये 31 पैसे 101 ते 300 युनिटसाठी 8 रुपये 95 पैसे अशी वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक ग्राहकांसाठी (उच्च दाबाचे ) दर 8 रुपये 4 पैसे वरून 8 रुपये 20 पैसे करण्यात आले आहे. वाणिज्य कर्मशीयल (उच्च दाबासाठी ) 13 रुपये 47 पैसे वरुन 13 रुपये 80 पैसे करण्यात आले आहे. तर लघूदाब( छोट्या उद्योगासाठी ) 7 रुपये 83 पैसे दरावरुन 8 रुपये 25 पैसे अशी वाढ करण्यात आलीआहे.
महागाईने जनता हैराण
विज नियमक आयोग दरवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेउन वीजबिला संदर्भात चर्चा होऊन त्यात वीजदर ठरवले जातात त्यानुसार वीजनियामक आयोग यांनी ठरवून दिलेल्या दरानुसार विजेची दरवाढ आकारण्यात येत असल्याची माहिती सुत्रानी दिली आहे. दरम्यान, चालुवर्षी थोड्याफार प्रमाणात पावसाने हजेरी लावली असली तरी पावसाच्या लपंडावामुळे शेतकरी राजा हैराण झाला आहे. पर्यायाने सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने सर्व सामान्य जनता अगोदरच पेट्रोल डीझेल जिवनावश्यक वस्तू दुध भाजीपाला यांच्या वाढत्या दरामुळे हैराण असताना चालू महिन्यात वीजवितरण कंपनीने विजेचे दर वाढवून ग्राहकांना एक प्रकारे विजेचा शॉक दिला आहे.