यावल : यावल-चोपडा मार्गावरील जुन्या चोपडा नाका परीसरातील पेट्रोल पंपावर मध्यरात्री पंपावरील कर्मचार्याने अन्य एकाच्या मदतीने रोकड लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी पंपावरील अन्य कर्मचार्यांना जाग आल्याने चोरी टळली तर या प्रकरणी यावल पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. नुसरत सलीम खान व अदनान नबी देशमुख अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पंपावरील कर्मचार्याकडूनच रोकड लांबवण्याचा प्रयत्न
शहरातील चोपडा मार्गावर परवेज खान मोहसीन खान यांच्या मालकीचा डी.के.पंप आहे. या पंपावर नुसरत सलीम खान हा कर्मचारी कामास असून बुधवारी तो सुटीवर असता त्याने अदनान नबी देशमुखच्या मदतीने सेल्स रूममधून 44 हजारांची रोकड ठेवलेली बॅग लांबवल्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी झोपलेल्या कर्मचार्यांना जाग आल्याने त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. या प्रकरणी पंपावरील कर्मचारी विजय गणेश सोनवणे (बाहेरपुरा, यावल) दोघा आरोपींविरुद्ध फिर्याद दिल्यावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलीस निरीक्षक अजमल पठाण, पोलीस अंमलदार संजय तायडे, पोलीस अंमलदार सुनील तायडे करीत आहेत.