पेपर तपासण्याची अडचण कुलगुरूंना माहीत नव्हती काय?

0

मुंबई:- मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या निकालाच्या विलंबावरून विधानपरिषदेनंतर विधानसभेतही शिक्षणमंत्र्यांना विरोधकांनी फैलावर घेतले. विद्यापीठाचे 17 लाखाच्या वर पेपर तपासायचे होते. यामध्ये अडचण येऊ शकते याबाबत कुलगुरूंना माहिती नव्हती का? असे म्हणत निकालाच्या विलंबास जबाबदार कुलगुरूंवर काय कारवाई करणार? असा सवाल विरोधकांनी सरकारला केला. परीक्षांचा निकाल विद्यापीठ प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे लागत असून याबाबत उच्चस्तरीय समिती नेमून कारवाई करण्याबाबत लक्षवेधी विधानसभेत शुक्रवारी उपस्थित केली. यावेळी विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांनी देखील शिक्षणमंत्र्यांना फैलावर घेतले. दरम्यान विद्यापीठासंबधी अधिकार कुलपतीचे असल्याने निकालासंबंधी सदस्यांच्या भावना व्यक्तीश: कुलपतींपर्यंत पोहोचविणार असून कुलगुरूंवर कारवाईचे आदेश राज्यपालांना असल्याचे शिक्षणमंत्री तावडे यांनी सांगितले.

विद्यार्थी व पालकांचा असंतोष
चर्चेला सुरुवात करताना अमित साटम यांनी उत्तरपत्रिका मूल्यांकन प्रक्रिया अत्यंत संथ असल्याचा आरोप केला. तसेच कॅप केंद्रात गैरप्रकार सुरू असल्याचे सांगितले. प्राध्यापकांऐवजी अन्य लोकं उत्तरपत्रिका तपासत असल्याचा आरोप सुचनेत करण्यात आला. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी 17 लाख पेपर तपासण्याची अडचण होती हे कुलगुरूंना माहिती होते. मग कुलगुरूंनी त्यावर उपाययोजना का केली नाही. यासाठी कुलुगुरुच जबाबदार असून त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित केला. आशिष शेलार यांनी देखील या विलंबामुळे विद्यार्थी व पालकांच्या मनात असंतोष असल्याचे सांगितले. याबाबत उच्चस्तरीय चौकशी नेमण्याची आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. यावर राज्यमंत्री वायकर यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून समिती नेमन्याचे आश्वासन दिले.

बृहत आराखडा तयार करणार
विलंबासाठी जबाबदार पाहता पुढील वर्षी प्रश्नपत्रिका तपासण्याच्या प्रक्रियेतील दोष दूर करुन निकाल वेळेत लावण्यासाठी बृहत आराखडा तयार करणार येईल, असे तावडे यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल लावण्याचे काम अंतिम टप्प्यात असून सध्या 4 लाख 7 हजार प्रश्नपत्रिका तपासणीचे काम बाकी आहे. परीक्षांचे निकाल लवकर लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विज्ञान शाखेच्या 96 टक्के, तंत्रज्ञान विषयाच्या 98 टक्के, व्यवस्थापन विषयाच्या 52 टक्के प्रश्नपत्रिका तपासून झाल्याचे तावडे यांनी सांगितले.

‘त्या’कंपनीवर कारवाई करणार
विद्यापीठाचे पेपर तपासण्याचे कॉन्ट्रॅक्ट मेरिट ट्रक नावाच्या कंपनीला दिले आहे त्या कंपनीवर कारवाई करणार का? असा सवाल साटम यांनी केला असता असल्याचे तावडे यावेळी म्हणाले. तावडे यांनी सांगितले की, कंपनीकडून नेमक्या काय -काय चुका झाल्या आहेत याबाबत विचारणा केली आहे. त्यांची बाजू ऐकणे आवश्यक आहे. बाजू न ऐकल्यास ते कोर्टातून सुटतील, त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी पुरती चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 31 जुलैपर्यंत पेपर तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिल्यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे. रोज सव्वा लाखाच्या वर उत्तरपत्रिका तपासल्या जात असून आतापर्यंत 90 टक्केच्या जवळपास उत्तरपत्रिका तपासल्या गेल्या असल्याची माहिती तावडे यांनी दिली. तसेच परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याआधी मार्कलिस्ट देणार असल्याची ग्वाही तावडेंनी दिली.