पेसा कायदा करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

0

पुणे । पेसा कायदा करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कट्टीबध्द असल्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा म्हणाले.

जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने बालगंधर्व रंगमंदिरात येथे 10 वी, 12 वी सह विविध क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त केलेल्या 122 विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.www.mahatraibal.gov.in  या संकेत स्थळासह आदिवासी विकास अ‍ॅप तसेच आदिवासी विकास विभागाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास व वन विभागाचे राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, राष्ट्रीय जनजाती आयोगाच्या सदस्या माया इवनाते, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनिषा वर्मा, आदिवासी विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश जगदाळे उपस्थित होते.

स्पर्धा परिक्षांसाठी विशेष वर्ग
आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. त्यासाठी आदिवासी मुलांना शासनाच्यावतीने प्रत्येक शहरातील नामांकीत शाळेत संधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने त्यांचा विकास होत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना चांगल्या वसतिगृहात राहण्याची सोयी करून दिल्या जात आहेत. स्पर्धा परिक्षेसाठी आदिवासी मुलांसाठी विशेष वर्गांचे आयोजन करण्यात येते. आदिवासी मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास योजना राबवत आहेत, असे सावरा यांनी सांगितले.