पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचेपैसे हे पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणासाठी हवे आहेत. त्यामुळे प्राधिकरण पीएमआरडीत विलिन करण्याचा घाट सत्ताधार्यांनी घातला असल्याचा आरोप, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तसेच प्राधिकरण पालिकेच्या हद्दीत येत आहे. त्यामुळे पालिकेत विलिन करण्याची मागणी देखील त्यांनी केली.
कारभारी तोडपाणीत गुंतले
आकुर्डी, प्राधिकरण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, शहरात कचर्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दररोज कचरा उचलला जात नाही. पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. आमदारांच्या बगलबलच्यांना पालिकेतील कामांची ठेके दिले जात आहेत. पाच लाखात होणारी कामाची निविदा 19 लाख रुपयांची काढली जाते. कारभारी म्हणवून घेणार्यांना शहराच्या विकासाचे काही-देणेघेणे राहिले नाही. तोडपाणी आणि जाहीरातबाजी करण्यात हे गुंतले आहेत.
कारवाई होणार नाही
भाजप नगरसेविका आणि तिच्या पतीच्या जाचामुळे एका गोरगरिब टपरीधारकाने आत्महत्या केली आहे. या नगरसेविकेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु, सत्ताधारी पक्षाची नगरसेविका असल्यामुळे कारवाई होत नाही. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांच्या चुकीच्या कामाला पाठबळ दिले जात आहे. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यांना राजाश्रय मिळत आहे, असा आरोपही पवार यांनी केला.
आश्वासन पूर्ण केले नाही
शास्तीकराच्या निर्णयाचा ‘जीआर’ हातात आल्याशिवाय त्यावर अधिक भाष्य करता येणार नसल्याचे सांगत पवार पुढे म्हणाले, शहरातील अनधिकृत बांधकामे, रेडझोन, बोपखेल येथील पुलाचा प्रश्न, बफर झोन असे सगळे प्रश्न सर्वकाही आलबेल करु असे सत्ताधार्यांनी निवडणुकीत सांगितले. परंतु, अद्यापर्यंत एकही आश्वासन पुर्ण केले नाही.