पुणे (विशेष प्रतिनिधी)- गुंतवणूकदार व ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल झालेले डीएसके बिल्डर्स लि.चे सर्वेसर्वा दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी दिलेल्या मुदतीत पुन्हा 50 कोटी रुपयांची रक्कम मुंबई उच्च न्यायालयात जमा केली नाही. नियमित जामीन हवा असेल तर एकूण ठेवीच्या रकमेपैकी 50 कोटी रुपयांची रक्कम न्यायालयात जमा करा, तरच जामीन देऊ अशी भूमिका न्यायालयाने घेतली होती. तरीही डीएसके हे पैसे न्यायालयात जमा करू शकले नाहीत. त्यामुळे उच्च न्यायालय चांगलेच संतापले व त्यांनी डीएसकेंची अक्षरशः खरडपट्टी काढली. तुम्ही वारंवार काही ना काही कारण सांगून वेळ टाळण्याचा प्रयत्न करत आहात; पण तुम्हाला अटक करायला क्षणाचाही वेळ लागणार नाही. तुम्ही सहाराश्री सुब्रतो रॉयसारखेच वागत आहात. पण आम्ही तुमची सहाराश्रीसारखीच अवस्था करू, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी डीएसकेंना सुनावले. काही तांत्रिक अडचणीमुळे जामिनाची 50 कोटीची रक्कम भरण्यात अपयश आले आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत ही रक्कम बँक ऑफ बडोदामध्ये भरणार असल्याचे डीएसकेंच्या वकिलांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयाने त्यांना 5 फेब्रुवारीपर्यंत ही रक्कम भरण्यास मुदत दिली आहे.
लिलावास योग्य मालमत्तांची यादी मागितली
गुंतवणूकदार व ठेवीदारांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसकेंविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. न्यायालयाने देणीदारांची रक्कम कशी देणार, याची माहिती देण्यास तसेच विकता येणार्या मालमत्तांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच, ठेवीदारांच्या देणीपोटी 19 डिसेंबरपर्यंत 50 कोटी रुपये उच्च न्यायालयात भरण्याचेही आदेश दिले होते. मात्र, ही तारीख उलटून गेली तरी डीएसके ही रक्कम जमा करू शकले नाहीत. त्याबद्दल उच्च न्यायालयाने डीएसकेंना वारंवार फटकारलेदेखील आहे. 25 जानेवारीरोजी आपण पैसे भरू असे आश्वासन डीएसकेंनी न्यायालयास दिले होते. परंतु, तरीही ते ही रक्कम जमा करू शकले नाहीत. आपल्या खात्यात पैसे भरले गेले आहेत मात्र काही तांत्रिक बाबीमुळे ही रक्कम वर्ग होण्यास वेळ लागत असल्याचे डीएसकेंनी गुरुवारी झालेल्या सुनावणीत सांगितले. यासाठी ज्या कंपनीने पैसे जमा केले आहेत, त्या अरविंद प्रभुणे यांनाच त्यांनी न्यायालयापुढे हजर केले. त्यांनीही डीएसकेंच्या खात्यात पैसे जमा केल्याची योग्य ती कागदपत्रे न्यायालयास दाखविली. यावर न्यायालयाने डीएसकेंचे म्हणणे मान्य करून, त्यांना 5 फेब्रुवारीपर्यंत अटकेस स्थगिती दिली. सोबतच 2 फेब्रुवारीपर्यंत लिलावासाठी योग्य अशा मालमत्तांची यादी न्यायालयास सादर करण्यास सांगितले.
नेमके काय झाले कोर्टात..
– 50 कोटी रुपये जमा करण्यास डीएसके अपयशी ठरल्यानंतर न्यायमूर्ती संतापले.
– डीएसकेंना कोठडीत पाठवण्यास एक क्षणही पुरेसा आहे, असा सज्जड दम भरला.
– स्वतःची सहरासारखी अवस्था करून घेऊ नका, असा सल्लाही दिला.
– डीएसकेंना तुरुंगात पाठवून गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार नाही, असेही नमूद केले.
– बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा झाले नाहीत, असे डीएसकेंच्या वकिलांनी सांगितले.
– पैसे भरणारे अरविंद प्रभुणे यांनी पैसे भरल्याची कागदपत्रे न्यायमूर्तींना दाखविली.
– 1 फेब्रुवारीपर्यंत बँक ऑफ बडोदामध्ये पैसे भरण्याची ग्वाही डीएसेकंनी दिली.
– 2 फेब्रुवारीपर्यंत विक्रीयोग्य मालमत्तांची यादी न्यायालयाने मागितली.
– कुलकर्णी दाम्पत्यास 5 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून असलेला दिलासा कायम ठेवला