Jewelery worth 30,000 stolen on the pretext of polishing in Kingaon यावल : सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याचे बहाणा करून महिलेचे मंगळसूत्र आणि सोन्याचे टोंगल मिळून 30 हजारांचे दागिणे भामट्याने किनगावातून लांबवले. यावल पोलिसात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
विश्वास संपादन करीत लांबवले दागिणे
किनगाव बु.॥ येथील प्रमिला नामदेव देवरे (57) या घरी एकट्या असताना बुधवार, 14 सप्टेंबर रोजी दोन अनोळखी तरूण त्यांच्या घराच्या ओट्यावर बसले. आमच्याकडे तांबे, पितळाचे भांडे चमकविण्याची पावडर आहे. त्यानुसार महिलेने घरात तांब्याचा तांबा आणून पॉलीश करण्यासाठी दिला. चोरट्यांनी पावडर लावून तांब्या चकावून दिला. त्यानंतर आम्ही सोन्याचे दागिने देखील पॉलिश करून देतो असे सांगितल्याने महिलेने त्यांच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत आणि टोंगल काढून चमकवण्यासाठी दिले.
डबा उघडताच फसवणूक झाली उघड
थोड्यावेळाने तुमचे काम झाले असून एक स्टीलचा डबा घ्या त्यात हळद व पाणी टाका, गॅस चालू करा आणि तो डबा गॅसवर ठेवा, असे सांगून काही कळण्याच्या आत दोन्ही भामट्यांनी 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून पळ काढला. इकडे महिलेने डबा उघडल्यानंतर त्यात दागिने नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी यावल पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.