पॉलिहाऊसच्या माध्यमातून चवळी पिकाचे विक्रमी उत्पादन!

0

शिरगाव : शेती करणे परवडत नाही, शेती फायद्याची राहिलेली नाही, अशी मानसिकता करून नशिबाला दोष देणारे अनेक शेतकरी आहेत. परंतु, नवनवीन प्रयोग राबवून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केली तर अल्प भांडवलातही शेतीतून चांगले उत्पन्न घेता येऊ शकते. सांगवडे (ता. मावळ) येथील शेतकरी सुरेश राक्षे यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांनी आपल्या शेतात 10 गुंठे क्षेत्रात पॉलिहाऊस उभारले आहे. यंदा त्यांनी पॉलिहाऊसमध्ये चवळीची लागवड केली होती. त्यांना चवळीचे विक्रमी उत्पादन मिळाले आहे. एका तोडणीला तब्बल 60 ते 70 किलो चवळी निघत असून, चवळीला बाजारात प्रतिकिलो 30 ते 40 रुपये असा चांगला भाव मिळत आहे.

यापूर्वीही राबविले नवनवे प्रयोग
सुरेश रात्रे यांनी यापूर्वीही आपल्या शेतीत नवनवे प्रयोग राबविले आहेत. ते प्रयोगदेखील असेच यशस्वी झाले आहेत. पॉलिहाऊसमध्ये चवळीची लागवड करण्यापूर्वी त्यांनी दुधी भोपळा आणि कारल्याची लागवड केली होती. तेव्हादेखील त्यांना दुधी भोपळा व कारल्याचे विक्रमी उत्पादन मिळाले होते. भाजीपाल्याला बाजारात चांगला भाव मिळतो. शिवाय बाराही महिने भाजीपाल्याला मोठी मागणी असते. हीच परिस्थिती ओळखून त्यांनी भाजीपाल्याची लागवड करण्याचे ठरवले. सध्या पॉलिहाऊसमधून पिकणार्‍या चवळीला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे राक्षे यांना चवळी विक्रीतून चांगला मोबदला मिळत आहे.

उत्पादनाविषयी काय म्हणतात राक्षे
पॉलिहाऊसमध्ये केवळ फुल शेती चांगली होते, असा आपल्या परिसरातील शेतकर्‍यांचा समज आहे. परंतु, तसे नाही. योग्य व्यवस्थापन कौशल्य असेल तर पॉलिहाऊसमध्ये भाजीपाल्याचीही शेती करता येऊ शकते. मी पॉलिहाऊसमध्ये यापूर्वी दुधी भोपळा व कारल्याची शेती केली आहे. आता चवळीची लागवड केली असून, त्याचे चांगले उत्पन्न निघत आहे. पहिली तोड केली तेव्हा; 35 किलो माल निघाला होता, असे सुरेश राक्षे यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना सांगितले.

राजकारणी अन् शेतकरीही!
सुरेश राक्षे हे सांगवडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. गावाच्या तंटामुक्ती समितीचे ते अध्यक्षही आहेत. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारही मिळाला आहे. राजकारणी आणि शेतकरी अशा दोन्ही भूमिका ते उत्तमरीत्या पार पाडत आहेत. दिवसाच्या सुरुवातीला प्रथम शेतात एक चक्कर नंतर बाकीची कामे, असा त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे. मावळ तालुक्यात शेतीसाठी हवामान फार चांगले आहे. बाजारपेठही जवळ आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या शेतात नवनवे प्रयोग राबविले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.