अंतर्गत सोयी-सुविधा न पुरवल्याचा भाजपा उमेदवाराला बसला फटका
भुसावळ (गणेश वाघ)- शहरातील प्रभाग क्रमांक 24 अ च्या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा दुर्गेश ठाकूर यांना संधी देत विक्रमी मतांनी निवडून आल्यानंतर सत्ताधारी भाजपासाठी हा धक्का मानला जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून शहरातील रस्त्यांची झालेली वाताहत, अवेळी पाणीपुरवठा तसेच रस्ते व आरोग्याच्या सोयी-सुविधा पुरवण्यास सत्ताधारी अकार्यक्षम ठरल्याने मतदारांनी मतपेटीतून रोष व्यक्त केल्याने सत्ताधार्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. यापूर्वी प्रभाग 24 मधून दुर्गेश ठाकूर हे जनआधारतर्फे निवडून आले होते मात्र जातप्रमाणपत्राअभावी त्यांना अपात्र व्हावे लागले मात्र नंतर पुन्हा ते याच प्रभागातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे राहिल्यानंतर मतदारांनी त्यांना विजयी केले.
जनआधारचे राष्ट्रवादीत विलीनीकरण
स्थानिक स्तरावरील केवळ एका प्रभागासाठी ही निवडणूक असलीतरी सत्ताधारी भाजपा व राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी आपली प्रतिष्ठा त्यात पणाला लावली होती. या निवडणुकीत नगराध्यक्ष रमण भोळे हे कुठेही सक्रिय दिसले नाही वा भाजपा उमेदवाराच्या अर्ज दाखलप्रसंगी त्यांचा सहभाग नसल्याने त्यावेळीदेखील आश्चर्य वर्तवण्यात आले होते. भाजपात अंतर्गत कलह प्रचंड असल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादी उमेदवाराला झाला शिवाय शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार दिला असलातरी ही खेळी राष्ट्रवादीच्या पथ्थ्यावर पडली. राष्ट्रवादीने मिळवलेल्या यशानंतर माजी आमदार चौधरींनी जनआधारचे विलीनीकरण राष्ट्रवादीत करण्याची घोषणा करून राजकीय धक्का दिला आहे तर आगामी निवडणुकीत ते राष्ट्रवादीतर्फेच ताकदीनिशी लढतील यात शंका नाही. सुमारे दिड वर्षांनी पालिकेच्या निवडणुका आहेत त्यामुळे त्यांनी आतापासून पालिकेचा आखाडा तापवण्यास सुरुवात केली आहे.
सत्ताधार्यांना आत्मपरीक्षणाची गरज
पोटनिवडणुकीत एका जागेवर जरी राष्ट्रवादीचा विजय असलातरी स्थानिक स्तरावर भाजपाची सत्ता आहे मात्र गेल्या तीन वर्षात ना अमृत योजनेचे काम पूर्ण झाले नाही रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला. स्वच्छतेचा शहरात बोजवारा उडाला आहे तर हतनूरचे वरदान लाभूनही शहरवासी तहानलेले आहेत तर आरोग्याबाबत न बोललेलेच बरे, अशी विदारक अवस्था भुसावळची आहे. भाजपात माजी मंत्री खडसे व आमदार संजय सावकारे यांना मानणारे दोन गट असून अधून-मधून सुरू असलेल्या धुसफूसचा शहर विकासावरही परीणाम दिसून येत आहे. दिड वर्षांनी पालिकेच्या निवडणुका आहेत त्यामुळे शहरात विकासात्मक कामे झाल्यास शहरवासी भाजपाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत हे सांगण्यास ज्योतिषाची गरज नसावी त्यामुळे आत्ताच सत्ताधार्यांनी अंतर्मुख होवून आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे.