पोलिसांचा धाक संपला : पुन्हा केळी उत्पादकाचे केळी घड कापले

कुंभारखेडा शिवारातील प्रकार : पंधरवड्यातील सहावी घटना

सावदा : चिनावलसह परीसरात वारंवार होणार्‍या शेतीमालाच्या चोर्‍यांमुळे केळी उत्पादक शेतकरी संतप्त असतानाच पुन्हा चोरट्याने कुंभारखेडा शिवारातील एका शेतकर्‍याचे पंचवीस ते तीस केळीचे घड कापत नुकसान केल्याचा प्रकार रविवारी रात्री समोर आल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहे. चोरट्यांना पोलिसांचा कुठलाही धाक नसल्याचा प्रकार या प्रकारातून उघड झाला आहे. दरम्यान, अनिल कडू पाटील या शेतकर्‍याचे या घटनेत 10 ते 15 हजारांचे नुकसान झाले असून अज्ञाताविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सावदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह
पंधरवड्यात केळी पिकाचे नुकसान होण्याची ही सहावी घटना असून आजपर्यंत चोरट्यांचा शोध न लागल्याने सावदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होवू लागले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिल्यानंतर यंत्रणेला आरोपी शोधता आलेले नसल्याने या भागातील शेतकरी संतप्त झाले आहे. चोरट्यांच्या उपद्रवामुळे या भागातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

घटनास्थळी आढळली चिठ्ठी
कुंभारखेडा शिवारात अनिल पाटील यांच्या शेतात कापलेल्या घडांसोबत पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात स्थानिक लोकांना कामाला सांगा अन्यथा अशाच प्रकारे शेतमालाचे नुकसान करीत राहणार असल्याचा उल्लेख आहे शिवाय शिवीगाळदेखील त्यातून करण्यात आली आहे. एका केळी खोडाजवळ ही चिठ्ठी सापडल्याचे सांगण्यात आले.