पुणे : पोलिसांनी शहरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्याच्या घटना मागील वर्षभरात अनेकदा घडल्या आहेत. मात्र, या धंद्याला कायमचा चाप बसविण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचेच स्पष्ट होत आहे. शहरात खुलेआम वेश्या व्यवसाय चालविणारे पोलिसांच्या कारवायांना भीक घालताना दिसत नाहीत. पोलिस ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करत असल्यानेच असे हे धंदे सुरू आहेत, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
येरवडा पोलिसांचे पितळ उघडे
कल्याणीनगर या उच्चभ्रू वसाहतीत चालणार्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. या भागात कुख्यात असलेल्या दोन दलाल महिला हे सेक्स रॅकेट चालवत होत्या. अशाप्रकारे अनेक सेक्स रॅकेट येथे सक्रीय असून, मुंबई, कोलकाता, हैदराबाद येथून आणलेल्या मुलींसह नेपाळी मुलींकडूनही वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे. या प्रकाराकडे येरवडा पोलिसांचे मात्र ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. गुन्हे शाखेच्या कारवाईत येरवडा पोलिसांचे पितळ उघडे पडले असून, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला येरवडा पोलिसांवर आता काय कारवाई करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे.
खासगी बंगल्यात वेश्या व्यवसाय
कल्याणीनगरमधील कुमार सोसायटीतील बंगला क्रमांक सीएल 4/8 येथे आरोपी महिला शबनाज मिना व कोमल चावला या दोघी वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. विविध भागातील मुलींसह काही महिलांमार्फत वेश्या व्यवसायाचे रॅकेट या बंगल्यात सक्रीय होते. तसेच, अनेक उच्चभ्रू नागरिकही येथे येत होते. त्यानुसार पोलिस पथकाने छापा टाकून शबनाज अल्ताफ मिना (वय 28, रा. धायरी) व कोमल राजकुमार चावला (वय 31, रा. कल्याणीनगर) यांना ताब्यात घेतले. तर विपूल रॉय हा आरोपी पळून गेला आहे. यावेळी पोलिसांनी तीन पीडित महिलांनाही ताब्यात घेतले. या तिघींच्या मदतीने व अन्य काही मुलींच्या सहाय्याने या दोघी या बंगल्यात वेश्या व्यवसाय करून घेत होत्या. त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलिसांत अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिस आयुक्त काय कारवाई करणार?
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश भोसले यांच्या सूचनेवरून दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद महाजन, पोलिस कर्मचारी यशवंत आंब्रे, विनायक पवार, शंकर पाटील, राहुल घाडगे, बशीर सय्यद, मल्लिकार्जुन स्वामी, सचिन गायकवाड, विल्सन डिसोजा, धनाजी पाटील यांच्यासह जगताप व विसापुरे या महिला पोलिसांनी केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, कल्याणीनगर परिसरात अनेक सेक्स रॅकेट सक्रीय असून, त्याकडे येरवडा पोलिस दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या कारवाईने पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला या येरवडा पोलिसांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.