यावल। गेल्या चार वर्षांपासून रहिवासायोग्य नसलेल्या येथील पोलिस इमारतीचा प्रश्न मार्गी लागेल का? असा प्रश्न पोलिस बांधवांकडून उपस्थित करण्यात येत आहे. दोन वर्षापूर्वी या इमारतीच्या देखभाल दुरूस्तीचा 1 कोटी 20 लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, त्यावर अद्यापही निर्णय नाही. परिणामी येथे बदलून येणार्या पोलिस कर्मचार्यांच्या रहिवासाचा प्रश्न सतत ऐरणीवर असतो.
यावल पोलिस स्टेशनला लागून शासनाची 8 हजार 396 चौरस मीटर जागा आहे. या जागेवर सन 1983- 84 मध्ये तालुक्यात कार्यस्थळी असणार्या पोलिस कुटुंबांना राहण्यासाठी तीन मजली इमारत उभारण्यात आली होती. मात्र, या इमारती अतिशय जुन्या असल्यामुळे जीर्ण झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून या इमारतीला पावसाळ्यात गळती लागत होती. कालांतराने ही इमारत रहिवासायोग्य नसल्याचे समोर आल्याने पोलीस प्रशासनातर्फे ऐन पावसाळ्यात तिला खाली करण्यात आले होते.
तत्कालिन पोलीस उपअधिक्षकांनी केली होती पाहणी
यानंतर 30 ऑक्टोबर 2014 रोजी यावल भेटीवर आलेले तत्कालिन पोलिस उपअधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालिन उपविभागीय अभियंता रमाकांत सुरवाडे यांच्यासमवेत पाहणी करत पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जानेवारी 2015 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे जिल्हा अधीक्षक अभियंता एस.एच. पगारे यांनी सव्वा कोटीचा दुरुस्ती आराखडा सादर केला होता. या तीन मजली इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर 12 अशी निवासस्थाने आहेत. दुरुस्तीत 36 खोल्यांचा विस्तार होईल. पूर्वीच्या 36 लहान ऐवजी मोठ्या क्षेत्रफळाच्या 18 खोल्यात तयार होतील.
परिवार धोक्यात
कुठलाही सण- उत्सव असो किंवा निवडणूका, वादाचे प्रसंग यावेळी पोलीस कर्मचार्यांना बंदोबस्ताची जबाबदारी हि असतेच मात्र आपल्या परिवाराला सोडून पोलीस दादा हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतात. मात्र ज्याठिकाणी त्यांचा परिवाराचा निवारा आहे. तेच ठिकाण सुरक्षित नसल्यामुळे पोलीस कर्मचार्यांना देखील पावसाळ्याच्या दिवसात या धोकादायक इमारतीत आपल्या परिवाराला ठेऊन आपली जबाबदारी देखील पाहावी लागते.
गटारींची सफाई होईना
तसेच या वसाहतींमध्ये नियमितपणे साफसफाई करण्यात येत नसल्यामुळे गटारींमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असून गटारी ओव्हरफ्लो झाल्या आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी फैलावत आहे.