पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झालेला आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

अकोला रेल्वे स्थानकावरून आरोपीच्या आवळल्या मुसक्या

जळगाव : भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयीताची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे दोन्ही कर्मचारी कैदी पार्टी म्हणून जिल्हा कारागृहात आरोपीला नेत असताना आरोपी महेश शिवदास दिक्षे (रा.लोणी, ता.रीसोड, जि.वाशीम) याने पोलिसांच्या हातावर तुरी दिली होती. आरोपी अकोला रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने गुरुवारी सायंकाळी त्याच्या मुसक्या आवळल्या.

जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल
भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात महेश दिक्षे याला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर भुसावळ उपकारागृहातून संशयीताला जिल्हा कारागृहात हलवण्याची जवाबदारी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचार्‍यांना देण्यात आली होती मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी दिक्षेने पळ काढला होता. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अकोल्यातून आरोपी जाळ्यात
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, विनोद पाटील, मुरलिधर बारी, अशोक पाटील आदींच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीताचा वाशीम जिल्ह्यातील रीसोड व लोणी परीसरात शोध घेतला. तपासात पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना संशयीत अकोला रेल्वे स्टेशनवर असल्याची माहिती मिळताच त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी आरोपीला अटक करण्यात आली. संशयीताला पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.