दापोडी : अपघातानंतर रस्त्यात गाड्या उभ्या करून वाहतूक कोंडी करणार्यांना पोलीस बाजूला घेत असताना पाचजणांनी पोलिसांवरच हल्ला केला. ही घटना दापोडी येथे गुरुवारी दुपारी घडली. रवींद्र कोंडगे (वय 22), शांताराम कोंडगे (वय 25), वैजनाथ कोंडगे (वय 28), आदिनाथ कोंडगे (वय 38, सर्व रा. खराबवाडी, चाकण), रवींद्र व्यवहारे (वय 22, रा. मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस कर्मचारी सचिन भागाजी म्हेत्रे यांनी याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक पांडुरंग गोफणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर आणि मोटारीचा सीएमई गेटजवळ दापोडी येथे अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कंटेनर चालकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तोपर्यंत मोटारीतील एका आरोपीने कंटेनर चालकाला मारहाणही केली होती. त्यानंतर मोटारीतील आरोपीने आपल्या साथीदारांना बोलावले. आरोपींनी रस्त्यात वाहने उभी करून रहदारीस अडथळा आणला. याबाबत माहिती मिळाल्यावर पोलीस पुन्हा घटनास्थळी गेले. त्यांनी आरोपींना बाजूला होण्यास सांगितल्याच्या कारणावरून आरोपींनी गोंधळ घालत पोलिसांनाच शिवीगाळ करत मारहाण केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एम.बी.गाढवे तपास करीत आहेत.