मुंबई । मुलीला अश्लील शब्दांत शिवीगाळ करून धमकी देणार्या रोडरोमियो विरोधात तक्रार करण्यास गेलेल्या माय लेकीची तक्रार लिहून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याने मुलीच्या आईने विक्रोळीतील सूर्यानगर पोलीस स्थानकात गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रविवार, 28 जानेवारी रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून शिला मौर्या (42) असे महिलेचे नाव असून उपचारासाठी महिलेला जवळील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेची प्रकृती स्थिर आहे.
अश्लील चाळ्यांनी होती त्रस्त
शिला मौर्या या आपला पती, चार मुली व मुलासह विक्रोळी पार्कसाईड वर्षानगर येथील दत्तगुरु चाळ येथे राहत आहेत. याच चाळीत राहत असणार्या संतोष निगडेकर याने चोरी केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांत तक्रार केल्याचा राग मनात घेत संतोष निगडेकर व त्याचा साथीदार सनी मुलींना अश्लील चाळे करून त्रास देत आहेत. मोठी मुलगी सुषमा मौर्या हिचे लग्न झाले होते. सुखाने संसार चालत असताना निगडेकर व त्याच्या मित्रांनी सुषमा हिच्या पतीला सुषमा बाबत गैरसमज आणून संसार मोडल्याचा आरोप शिला मौर्या यांनी केला आहे.
आत्महत्येच्या प्रयत्नानंतर नोंदवला गुन्हा
गेली चार वर्ष कारवाई होत नसल्याने अखेर सूर्यानगर पोलीस स्थानकात गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नानंतर सूर्यानगर पोलिसांनी संतोष निगडेकर आणि त्याचा मित्र सनी या दोघांवर भादंवि कलम 509 , 34 , 506 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांच्या असहकार्यामुळे नाराज
काल रविवारी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास संतोष निगडेकर व त्याचा मित्र सनी दोघांनी माझी लहान मुलगी कोमल मौर्या हिच्याशी अश्लील वर्तन करत शिवीगाळ केल्याने मी व माझ्या तिनी मुलींना घेऊन सूर्यानगर पोलीस स्थानकात तक्रार करण्यास गेले असता पोलिसांनी आमची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली.