पुणे-देशभरातील नक्षलवादी समर्थकांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काल पत्रकार परिषदेत अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी पुरावे दाखल काही पत्रे वाचून दाखवली. या पत्रांमध्ये त्यांनी कॉम्रेड तेलतुंबडे यांनी रोना विल्सन यांना लिहिलेले पत्रही वाचून दाखवले. मात्र या पत्रांमध्ये काहीही तथ्य नाही ही पत्रे धादांत खोटी आहेत असा दावा दलित लेखक आनंद तेलतुंबडे यांनी केला आहे. तेलतुंबडे यांच्या घरावरही पोलिसांनी छापा मारला होता.
पोलिसांनी जी काही पत्रे दाखवली त्यापैकी कुठलेही पत्र आपल्याला आले नाही. कॉम्रेड आनंद हे पॅरिसमध्ये ज्या परिषदेसाठी उपस्थित राहिले होते त्यासाठी आर्थिक मदत पुरवल्याचा उल्लेख माओवादी नेते प्रकाश यांनी लिहिलेल्या पत्रात असल्याचाही दावा पोलिसांनी केला होता. दलित समस्यांवर आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यासाठी दरवर्षी १० लाख रूपये जमा करण्याचा निर्णय घेतल्याचीही नोंद या पत्रात होती. याबाबत विचारले असता पोलीस दररोज सत्य साईबाबांच्या हातचलाखीसारख्या खोट्या गोष्टी सादर करत आहेत असे उत्तर तेलतुंबडे यांनी दिले. विदेशी दौऱ्यांबाबतची योग्य कागदपत्रे आपल्याकडे आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.