नवि दिल्ली। सध्या सुरू असलेल्या आयपीएल वर सुरू असलेल्या जुगाराला आळा घालण्यासाठी सट्टेबाजांना अटक करण्याची मोहीम पोलिसांनी उघडली आहे. यामध्ये आतापर्यंत दिल्ली, कानपूरमध्ये सट्टेबाजी रॅकेटचा पदार्फाश करण्यात आला. त्यानंतर गाझियबादमधून आणखी सहा सट्टेबाजांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे 70 हजार रुपये सापडले असून, ते इंडियन प्रिमियर लीगमधील सामन्यांवर सट्टेबाजी करत होते.
गाझियाबाद लिंकरोडवर छापा मारुन पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून अँड्रॉईड फोन, एक मारुती स्विफ्ट कार, एक बाईकही पोलिसांनी ताब्यात घेतली. गुरुवारी कानपूर येथील एका हॉटेलमधून रमेश शहा, विकास चौहान आणि आणखी एकाला सट्टेबाजी प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. दोन माबाईल फोन, डायरी आणि चार लाख 40 हजाराची रोकड त्यांच्याकडून जप्त केली होती. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर सनराजयर्स हैदराबाद आणि गुजरात लायन्समध्ये होणा-या सामन्याआधी ही अटक झाली आहे. दोन्ही संघ लँडमार्क हॉटेलमध्ये उतरले असून आणि बुकीसुद्धा त्याच हॉटेलमध्ये बसून बेटींग करत होते. दिल्ली पोलिसांनी पूर्व दिल्लीतील शहादरा भागातून एका बेटींग रॅकेटचा पदार्फाश केला होता. पोलिसांनी सहा जणांना अटक केली.