पोलिसांमधील वाढती गुन्हेगारी

0

सध्या महाराष्ट्र पोलीस दलातील साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येच्या प्रकरणात पोलीस करत असलेला तपास आणि त्यामध्ये पुढे येणारी नवीन माहिती हे सर्व वाचून मन सुन्न होते. एका महिला पोलीस अधिकार्‍याची हत्या आणि त्यामध्ये त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांचा सहभाग हे निश्‍चितच चिंताजनक आहे. पोलिसांनीच सहपोलिसाची केलेली हत्या आणि त्यासाठी वापरलेल्या क्लृप्त्या या सराईत गुन्हेगाराप्रमाणेच वर्तन दर्शवणार्‍या आहेत. पोलीस दलामध्ये घडलेली ही एकमेव घटना नाही. यापूर्वीही पोलीस दलामध्ये पोलिसांकडून विविध अपराध आणि पुरुष पोलिसांकडून सहकारी महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या आहेत आणि घडतही आहेत. या घटनांची वारंवारता पाहता महिलांना खरी भीती रक्षक म्हणवणार्‍या अशा गुन्हेगार पोलिसांकडून आहे, असे वाटल्यास चुकीचे ते काय? पोलीसच आता गुन्हेगार बनू लागल्याने कायद्याची जरबच संपू लागली आहे, असे वाटू लागले आहे. ज्या पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखायची, तेच पोलीस गुन्हे करायला लागल्यामुळे पोलिसांच्या ब्रीदवाक्यालाच धक्का बसू लागला आहे. यामुळेच पोलीसदल हे गुन्हेगारांचा अड्डा बनू लागला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

मागील वर्षी भायखळा महिला कारागृहातील वॉर्डन मंजुळा शेट्ये यांना कारागृहातील 6 महिला पोलिसांनी विवस्त्र करून अमानुष मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर विधीमंडळात आवाज उठवला गेला, पण आरोपींना अद्यापही जरब बसेल, अशी कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत. बीड जिल्ह्यातील आष्टी पोलीस ठाण्यात 4 महिन्यांपूर्वी कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचार्‍याने तत्कालीन पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई आणि एक पत्रकार यांनी तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार थेट जिल्हा न्यायालयात नुकतीच प्रविष्ट केली. त्यानंतर आष्टीतील एका महिलेने एका पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि एक पोलीस अधिकारी यांनी सरबतातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली. वरील सर्वच प्रकरणांतील आरोपींवरील गुन्हे सिद्ध होण्याची प्रक्रिया चालू आहे. वरील सर्व उदाहरणे ही वानगीदाखल असून, पोलिसांमधील वाढत्या गुन्हेगारीची मानसिकताच दर्शवतात, अशी प्रकरणे ही गेली काही वर्षे घडतच आहेत. मग सत्ता कोणत्याही पक्षाची असो, पण त्याला आळा घातला जात नाही. सातत्याने पोलिसांच्या गुन्ह्यांविषयी एवढी माहिती पुढे येत असताना कोणीही लोकप्रतिनिधी त्याविरोधात विधीमंडळात सातत्याने आवाज उठवणे वा आंदोलन करताना दिसत नाही. पोलिसांमधील वाढत्या गुन्हेगारीवरून कोणताही राजकीय पक्ष मग तो सत्ताधारी असो वा विरोधक असो, त्यापैकी कोणीही पोलीस महासंचालकांपासून ते मंत्र्यांपर्यंत कोणाचाही राजीनामा मागताना वा स्वतःहून ते देताना दिसत नाहीत. यावरूनच पोलिसांनी मनोवृत्ती मला कोण विचारणार ? अशी बनली आहे आणि त्यातूनच पोलिसांमधील गुन्हेगारी वृत्तीला बळ मिळाले आहे. पोलिसांवर हल्ले झाल्यास त्यांच्यातील माणूस पाहा, असे केवळ म्हटले जाते, पण त्यांच्यातील वाढत्या गुन्हेगारीवर कोणीही कोणतीही कारवाई करण्यास पुढे येतांना दिसत नाही. मानवाधिकार आयोग, राज्य महिला आयोग आणि अन्य संघटना यांपैकी किती जण पुढे येऊन त्या गुन्हेगारांना शिक्षा होण्यास शेवटपर्यंत प्रयत्न करताना दिसतात? पोलिसांमधील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आज न्याययंत्रणेने स्वतःहून नोंद घ्यावीफ, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहेकारण तोच एक सध्या आशेचा किरण त्यांना वाटतो आहे.

– नित्रानंद भिसे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8424838659