पोलिसांमध्येच जोरदार फ्रिस्टाईल

0

जळगाव । चिमुकले राममंदिरात पुजेचे साहित्य ठेवण्याच्या कारणावरुन सहायक फौजदार नामदेव बाबुराव ठाकरे, कर्मचारी गोपीचंद पाटील व राजू देवराम शिंदे यांच्यात शनिवारी सकाळी साडे आठ वाजता मंदिराच्या आवारातच जोरदार फ्रिस्टाईल झाल्याची घटना घडली आहे. पाटील व शिंदे यांनी आपल्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्यांच्याविरुध्द कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा असा अर्ज सहाय्यक फौजदार नामदेव ठाकरे यांनी जिल्हा पेठ पोलिसात दिला आहे.

नरडी दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप…
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सहाय्यक फौजदार नामदेव ठाकरे हे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. चिमुकले राममंदिरात ते दररोज सकाळी दर्शनाला जातात.नेहमीप्रमाणे ते शुक्रवारी दर्शनाला गेले असता तेथील ट्रस्टी पोलीस कर्मचारी गोपीचंद पाटील यांनी त्यांना पुजेचे साहित्य मंदिरात घेऊन जायचे नाही असे सांगितले. त्यावरुन दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. रात्रपाळीला असलेल्या निंबा माळी या कर्मचार्‍यानेही त्यांना ट्रस्टींचा तसा निरोप दिला. त्यामुळे ठाकरे यांनी साहित्य उचलून घेतले .ठाकरे हे शनिवारी सकाळी पुन्हा मंदिरात गेले असता तेथे गोपीचंद पाटील व राजू शिंदे यांच्याशी त्यांचा वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की सर्व जण एकमेकाच्या अंगावर धावून गेले. पाटील व शिंदे या दोघांनी नरडी दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. या वादानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्याकडे फिर्यादच लिहून दिली, मात्र गायकवाड यांनी हा अदखलपात्र गुन्हा आहे, असे सांगून हाकलून लावल्याचेही ठाकरे यांचे म्हणणे आहे. अमळनेरला असताना आमच्यात वाद होते, त्यामुळेच त्यांनी माझी तक्रार घेतली नाही, असाही आरोप ठाकरे यांनी केला. दरम्यान, ठाकरे हे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे.