शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल केल्याचा राग ; होमगार्डच्या अंगावर गुलाल फेकून दिली धमकी
जळगाव– सार्वजनिक मंडळाचा गणपती घेवून जात असताना वाहतुकीस अडथळा निर्माण होवू नये म्हणून बंदोबस्तातील होमगार्डने तरुणांनी पुढे जावून काही अंतरावरुन मिरवणुक काढण्याची सुचना केली. मात्र तरीही न एैकता तरुणांनी उलट मुजोरी करुन विरोध करणार्या होमगार्डच्या अंगावर गुलाल फेकल्याची घटना सोमवारी सायंकाळी अजिंठा चौकात घडली. एवढ्यावरच न जुमानता तरुणाने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाल्याच्या रागात उलट पोलिसांवर विनभंगांचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत चक्क तक्रार देण्यासाठी आपल्या बायकोला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पत्नी पतीच्या फोनवरुन काही मिनिटातच पोलीस ठाण्यात पोहचली. कर्मचार्यांनी खोटी तक्रार दाखल करणार्या तरुणाला प्रतिसाद न दिल्याने त्याने याच तक्रारीसाठी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली होती.
काय घडली घटना
शहरासह जिल्ह्यात सर्वत्र श्रींचे आगमन झाले. शहरात अजिंठा चौफुलीवर मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटले आहे. येथून मुर्ती घेवून जात असताना वाहतूक सुरळीत करण्यासह बंदोबस्तासाठी एमआयडीसीच्या पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, दादासाहेब वाघ, राजू राणे, कृष्णा पाटील, विनोद बोरसे, राजेंद्र ठाकूर यांच्यासह होमगार्ड मनोज कोळी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीकडून ऑटो आयकॉनचे कर्मचारी ढोलताशांसह गुलालाची उधळण करत मिरवणुक घेत जात होते. यांना होमगार्ड मनोज कोळी यांनी वाहतुकीची कोंडी होत असून काही अंतरावरुन मिरवणुक काढा तसेच गुलाल फेकू नका, असे सांगितले. यानंतर मंडळातील उमेश पाटील याने काही एकन एैकता मुद्दामहून होमगार्ड कोळी यांचे अंगावर गुलाल फेकला. गुलाल का फेकला याचा जाब विचारल्यावर उमेश होमगार्ड कोळी यांच्यावर धावून आला. त्याच्यासाठी राहूल पाटील हाही धावून आला. व होमगार्डला उद्देशून तुझ्या कोणत्या बापाचे गेले गुलाल टाकला तर अशी अरेरावी केली. यानंतर सोबतच्या कर्मचार्यांनी उमेश यास ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले.
पतीचा फोन अन् पत्नी पोलीस ठाण्यात पोहचली
होमगार्ड कोळी यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात उमेश तसेच राहूल यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याचा राग आल्याने राहूल याने उलट होमगार्डला तुझ्यावर विनभंगाचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली. व त्याने खोटी विनभंगाची तक्रार देण्यासाठी पत्नीला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पत्नी पोलीस ठाण्यात पोहचली. मात्र पोलिसांनी प्रतिसाद न दिल्याने अरेरावी करत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करतो, असे सांगत पोलीस ठाण्यातून निघून गेला. उमेश जयवंतराव पाटील रा. तरसोद यास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील करीत आहेत.