उल्हासनगर । आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना घेरा घालून 8 जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके व लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात 2 पोलीस कर्मचार्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी झाल्याची घटना उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या टोळक्याने डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत दराडे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व आरोपी हे झारखंडमधील येथील राहणारे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र यादव याच्याविरुध्द शहरातील बेनी यादव यांना (रा. कॅम्प क्रमांक 1, म्हारळ नाका, धोबीघाट परिसर) यांना लाकडी दांडक्याने व ठोशाबुक्क्यांनी मारहाण केल्याने अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील जितेंद्र याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस बाबासाहेब आव्हाड व डोळे हे दोघे रात्रीच्या वेळी गेले होते.
पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की
त्यावेळी जितेंद्र यादव याच्या खोलीत रामचंद्र यादव, पिंटू यादव, विरेंदर यादव, लालूकुमार यादव, सीताराम यादव, भागीरथ यादव, गणेश यादव हेदेखील उपस्थित होते. हे सर्व परप्रांतीय तिथे भाड्याने खोली करून राहतात. पोलीस कर्मचारी आव्हाड व डोळे यांनी आरोपी जितेंद्र यादव याला ताब्यात घेतले. यावेळी त्या टोळक्याने सरकारी कामात अडथळा निर्माण करत दोन्ही पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली. त्या ठिकाणाची परिस्थिती पाहून आव्हाड यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात फोन केला.
8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
त्याठिकाणी त्वरित पोलीस उपनिरीक्षक पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भरत दराडे हे पोलीस कर्मचारी ठाकरे, पवार, भोईर यांच्यासह पोहोचले. पण त्या 8 जणांच्या टोळक्याने सर्वच पोलिसांना घेरा घालून त्यांना लाकडी दांडक्याने व लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बाबासाहेब आव्हाड, डोळे व इतर पोलीस किरकोळ जखमी झाले, तर एएसआय दराडे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कल्याण येथील फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी जितेंद्र यादव याच्यासह 8 जणांविरुद्ध उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आहिरे करत आहेत.