पोलिसांशी हुज्जत घालणारी महिला न्यायालयीन कोठडी

0

यावल- साने गुरूजी विद्यालयाच्या केंद्राबाहेर चोपड्याच्या दोन विद्यार्थ्यांना टोळक्याने मारहाण करून पळ काढली होती तर तीन संशयीतांना ताब्यात घेतल्यानंतर एका महिलेने मुलास सोडण्याच्या कारणावरून गोंधळ घातल्याने तिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. संशयीत महिलेस बुधवारी न्यायालयात हजर केले असता तिला 20 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यातील एकाही संशयीतास पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल
दानिश इरफान बेग (रा.चोेपडा) या विद्यार्थ्यांने मंगळवारी दिलेल्या फिर्यादीनुसार तो व त्याचा मित्र परवेज मुसा तेली )(19, रा.चोपडा) हे येथील साने गुरुजी विद्यालयात इयत्ता दहावीची परीक्षा देण्यासाठी आल्यानंतर मंगळवारी इंग्रजीचा पेपर सुटल्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास परीक्षा केंद्राच्या बाहेर त्यांना शहरातील रहिवासी गणेश राजु कोलते व त्याच्या सोबतच्या सहा ते सात जणांच्या टोळक्याने हातात लाठ्या-काठ्या घेऊन मारहाण केली तसेच चेहर्‍यावर रुमाल बांधून पळ काढला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शहरात सर्वत्र संशयीतांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, मंगळवारी चार वाजेच्या सुमारास उषाबाई सुधाकर हिवरकर (47, संभाजी पेठ, यावल) यांनी पोलीस ठाण्यात येऊन परीक्षा केंद्रावरील भांडणांमध्ये माझ्या मुलास पोलिसांनी कशा करता इथे आणलं? त्याचा काही दोष नसताना तुम्ही त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्याला अटक करणार काय ? अशा पद्धतीने प्रश्नांची सरबत्ती करत पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळकर तसेच पोलिस निरीक्षक डी.के. परदेशी यांच्याशी त्यांनी हुज्जत घातल्याने तिच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी येथील न्यायालयात त्यांना हजर करण्यात आल्यानंतर न्या.डी.जी.जगताप यांनी त्यांना 20 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.