पोलिसांशी हुज्जत घालणार्‍यास अटक

0

चिंचवड : कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचार्‍याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा घातल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. हा प्रकार रविवारी (दि. 8) रात्री सातच्या सुमारास वाकड पुलाजवळ घडला. पोलीस नाईक शरद विंचू यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार रिजवान रियाउद्दीन सय्यद (वय 21, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला अटक केली. रविवारी रात्री वाकड पुलाजवळ विंचू नाकाबंदी करत होते. त्यावेळी रिजवान रस्त्याने जात होता.

अर्वाच्च भाषेचा वापर
कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी शरद यांनी रिजवान याला थांबवले. त्यावेळी, तुम्हाला गाड्या अडविण्याचा अधिकार कोणी दिला, असे विचारात मोठ्याने आरडा-ओरडा करून शरद यांना अर्वाच्य भाषेचा प्रयोग केला. अंगावर धावून येत सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी रिजवान याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक एस. जी. गोडे तपास करीत आहेत.

कागदपत्रे मागितल्याचा राग
दरम्यान, वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई एम. पी. जाधव यांना कागदपत्रे मागितल्याचा कारणावरून मंगळवारी (दि. 2) घडला होता. या घटनेला एक आठवडाही उलटला नसताना पुन्हा वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे शहराची सुरक्षा करणारे पोलिसच सुरक्षित नसतील तर शहरातील नागरिक कितपत सुरक्षित असतील, असा प्रश्‍न उद्भवला आहे.