पोलिसाच्या कर्तव्यदक्षतेमुळे वाचले सात वर्षाच्या मुलाचे प्राण

0

शिरूर । रांजणगाव गणपती पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल रघुनाथ हाळणोर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यात बुडणार्‍या सात वर्षाच्या मुलाचे प्राण वाचविले. चैतन्य जोरी असे या मुलाचे नाव आहे. रांजणगाव गणपती पोलिस स्टेशनजवळील खाणीत असणार्‍या विहिरीसारख्या पाणी साचलेल्या डोहामध्ये एक लहान मुलगा मित्रांसमवेत मासे पाहण्यासाठी गेला होता. तो पाय घसरून पाण्यात बुडाल्याची माहिती हाळणोर यांना मिळाली.

पाण्यामध्ये शेवटची घटका मोजत असताना सर्वजण फक्त बघत बसले होते. हाळणोर यांना लहान मुलगा डोहात पडल्याची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. गर्दीला बाजूला सारत तत्परतेने डोहामध्ये उडी मारून चैतन्यला बाहेर काढले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून तात्काळ राजंणगाव येथील गजानन हॉस्पीटलमध्ये दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. पुढील उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. हाळणोर यांच्या धाडसामुळे एका मुलाला जीवदान मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.