पोलिस अधिकार्‍याच्या घरावर सुरक्षा रक्षकाचा डल्ला

0

पिंपरी-चिंचवड : नवी मुंबई येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर काम करणार्‍या अधिकार्‍याच्या घरातील दागिन्यांवर सुरक्षा रक्षकानेच डल्ला मारल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. पिंपळे सौदागर येथील यशदा नक्षत्र या उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये पहाटे चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली तर कपाटात ठेवलेली पिस्तूल इतर ठिकाणी फेकण्यात आले. विलास सहादु पुजारी (वय 46, रा. यशदा नक्षत्र अपार्टमेंट, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोसायटीचा सुरक्षारक्षक महेंद्रसिंग (पूर्ण नाव माहिती नाही अंदाजे वय 25) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घरी कुणी नसल्याचा घेतला गैरफायदा
पुजारी हे नवी मुंबई येथील बेलापूर पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. कुटुंबासमवेत ते लग्नासाठी बाहेर गावी गेले होते. या संधीचा फायदा घेत सोसायटीचा सुरक्षा रक्षक महेंद्रसिंग याने घराच्या बेडरुमच्या खिडकीचे ग्रील उचकटून घरात प्रवेश केला. बेडरुमधील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण दोन लाख 14 हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. पुजारी यांचा भाचा त्यांच्यासोबत राहतो. तो मंगळवारी सायंकाळी सहा वाजता कामावर गेला होता. त्यामुळे घरात कोणीच नव्हते. हीच संधी साधून सुरक्षा रक्षकाने त्यांचे घर साफ केले. पुजारी यांचा भाचा पहाटेच्या सुमारास कामावरून परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, ज्या लॉकरमधून दागिने आणि पैसे चोरीला गेले, त्याच लॉकरमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक पुजारी यांचे पिस्तूल होते. ते इतर ठिकाणी फेकून दिले होते. घरात तपासणी करताना ते पिस्तूल पोलिसांना सापडले. घटनेनंतर सुरक्षा रक्षक महेंद्रसिंग पळून गेला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.