पोलिस आयुक्तालय म्हणजे चौकी बांधण्याइतके सोपे नाही!

0

पत्रकार परिषदेत पालकमंत्री गिरीश बापट यांचे प्रतिपादन

पिंपरी :– पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आयुक्तालयासाठी जागेचा शोध सुरु आहे. त्यासाठी प्रशस्त जागा, मनुष्यबळ लागणार आहे. याबाबत गृहखात्याशी चर्चा सुरु आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पुणे जिल्ह्याच्या पोलिस आयुक्त, ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा सुरु आहे. पोलिस आयुक्तालयासाठी तीन जागांचा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे. त्याबाबत पुढील आठवड्यात बैठक बोलविण्यात आली आहे. मात्र पोलिस आयुक्तालय बांधणे म्हणजे चौकी बांधण्याइतके सोपे नाही, असे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

प्राथमिक सुविधा उपलब्ध
पालकमंत्री बापट म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालयाची घोषणा झाली आहे. त्यासाठी स्वतंत्र जागा लागणार आहे. सुमारे 50 एकर जागेची आवश्यकता आहे. कर्मचारी संख्या मोठी असणार आहे. साहित्य लागणार आहे. पोलिस आयुक्तालयासाठी तीन जागांचा प्रस्ताव आला आहे. जागा भाड्याने घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आम्ही सरकारी जागांचा शोध घेत आहोत. याबाबत गृह खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी आमची चर्चा सुरु आहे. पोलिस आयुक्तालयाची घोषणा झाली म्हणजे ते लगेच सुरु होत नाही. त्यासाठी प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन द्यावा लागणार आहेत

पोलिस आयुक्तालयात ग्रामीणच्या हद्दीतील नऊ ठाणे आणि शहराच्या हद्दीतील पाच ठाणे समाविष्ट होणार आहेत. पोलिस आयुक्तालसायाठी तीन जागांचा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे. त्याबाबत पुढील आठवड्यात बैठक बोलविण्यात आली आहे. त्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आम्ही निर्णय घेत नाहीत. आमचे काम सुरु आहे. लवकरच पोलिस आयुक्तालय कार्यान्वित होईल असेही ते म्हणाले.

2,633 पदे नव्याने भरती
दरम्यान, शहरातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. त्यासाठी शहरातील विविध पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर स्वतंत्र पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला मंत्रीमंडळाच्या 10 एप्रिल 2018 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या विविध कक्षांसाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण चार हजार 840 पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे पोलिस आयुक्तालय आणि पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण कडून दोन हजार 207 पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. उर्वरित दोन हजार 633 पदे नव्याने भरती करण्यात येणार आहेत. नव्याने भरती करावयाची पदे तीन टप्प्यात भरली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 60 टक्के, त्यानंतर दोन वर्षांनी दुसर्‍या टप्प्यात 20 टक्के आणि त्यानंतर दोन वर्षांनी तिसर्‍या टप्प्यात 20 टक्के पदे भरली जाणार आहेत.