चाळीसगाव : पोलिस कारवाईपासून वाचण्यासाठी पळ काढताना वाळूचे ट्रॅक्टर रेल्वे पुलाच्या कमानीवर आदळले. ही घटना शिदवाडी गावाजवळ घडली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने परीसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
पोलिसांना पाहताच पळवले ट्रॅक्टर
मेहुणबारे पोलिस ठाण्याचे नाईक प्रतापसिंग मधुरे व कॉन्स्टेबल हनुमंत बाधेरे हे वरीष्ठांच्या आदेशान्वये शनिवार, 11 रोजी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना त्यांना कळमडू ते कोळगाव रस्त्यावर निळ्या रंगाचे सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर (एम.एच.24 ए.डब्ल्यू.0784) हे भरधाव वेगात दिसल्याने त्यांनी ते थांबवले. यावेळी ट्रॅक्टर चालकाला वाळू परवान्याची विचारणा केली असता चालकाने परवाना नसल्याचे सांगितल्यानंतर ट्रॅक्टर जप्त करून चालकाला मेहुणबारे पोलिस स्टेशनला येण्यास सांगितले असता
ट्रॅक्टर चालक विलास रवींद्र देसले (पिंप्रीहाट, ता.भडगाव) पोल्लिसांच्या मागे ट्रॅक्टर घेऊन पोहरे, दस्केबर्डी, शिदवाडीमार्गे मेहुणबारेकडे येत असतांना शिदवाडी गावाच्या बाहेर रेल्वे पुल ओलांडून येत असतांनाच चालकाने यू टर्न घेत ट्रॅक्टरमधील वावळू हॅड्रोलीक करीत ट्रॅक्टर परत शिदवाडीकडे नेत पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र रेल्वे पुलाखाली असलेल्या लोखंडी कमानीवर ट्रॅक्टर आदळले. यात सार्वजनिक मालमत्तेसह ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले मात्र ट्रॅक्टर चालक बचावला. हा प्रकार शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला.
मेहुणबारे पोलिसात गुन्हा
या ट्रॅक्टरमध्ये सुमारे आठ हजार रूपये किंमतीची दीड ब्रास वाळू होती. विना परवाना वाळूची चोरी करीत तिचे वाहतूक केल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालक विलास रवींद्र देसले याच्या विरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात पोलिस नाईक प्रतापसिंग मथुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.