पोलिस ठाण्याच्या आवारात राजकीय पदाधिकारी भिडले

0

जळगाव । मुलीच्या छेड काढल्याच्या कारणावरून दोन वेगवेगळ्या पक्षातील राजकीय पदाधिकारी रामानंदनगर पोलिस ठाण्यातच भिडल्याची घटना सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. दोन्ही पदाधिकार्‍यांच्या वादामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी वादात हस्तक्षेप करण्यात आल्यानंतर वादावर पडदा पडला. दरम्यान, मुलींची छेड काढल्याच्या कारणावरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात बुलेटस्वार तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छेड काढणार बुलेटस्वार तरूण कोण? याचा रामानंदनगर पोलिस शोध घेत असून पोलिसांनी एमएच.19.बीडब्ल्यु.3900 क्रमांकाची बुलेट ताब्यात घेतली आहे.

पोलिस निरिक्षकांची घेतली भेट
शिक्षणासाठी समर्थ कॉलनीत भाड्याने रूम करून राहणार्‍या तरूणी रविवारी दुपारी 2 ते 2.30 वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर घराकडे परतत होती. प्रभात चौकातील डॉ. नारखेडे यांच्या दवाखान्यासमोरून जात असताना बुलेटस्वार (क्रं.एमएच.19.बीडब्ल्यु.3900) तरूणाने तरूणीची छेड काढत हात पकडण्याचा प्रयत्न केला तसेच शिवीगाळ केली. भयभीत झालेल्या तरूणीने इतर मैत्रींणा घडलेला प्रकार सांगितला. व त्यानंतर हा प्रकार त्यांनी शिवसेनेच्या शोभा चौधरी यांना सांगितला. रविवारीच रामानंदनगर पोलिस ठाणे गाठत घटनेची माहिती तरूणींनी पोलिसांना दिली. त्यानंतर सोमवारी शोभा चौधरी या तरूणींसह रामानंदनगर पोलिस ठाणे गाठत पोलिस निरिक्षक बी.जे.रोहम यांची भेट घेऊन संपूर्ण हकीकत सांगितली. तर एका पोलिसाने तक्रार घेण्यास टाळाटाळ करत वाद घेतल्याचाही प्रकार त्यांनी सांगितला. छेड काढणारा तरूण हा राष्ट्रीवादी पक्षाचे तसेच माजी जि.प.सदस्य रमेश माणिक यांच्या मुलगा असल्याचे तरूणीने व शोभा चौधरी यांनी रोहम यांनी सांगितले.

मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून वाद
पोलिसांनी रमेश माणिक यांना घटनेच्या माहितीसाठी पोलिस ठाण्यात बोलवून घेतले होते. दरम्यान, मुलाचे लग्न ठरले असून रविवारी मुलगा दिवसभर घरातच होता. राजकीय षडयंत्र रचले जात आहेत, असे रमेश माणिक यांनी रोहम यांना सांगितले. दरम्यान, पोलिस निरिक्षकांच्या कार्यालयात चर्चा झाल्यानंतर दोन्ही गट बाहेर आले. त्यानंतर पोलिस ठाण्याच्या आवारात छेड काढल्याच्या कारणावरून शोभा चौधरी व रमेश माणिक यांच्या जोरदार शाब्दीक वाद होवून दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून आलेत. या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. गोंधळ सुरू असल्याचे पाहून रामानंदनगर पोलिसांनी तात्काळ वादात हस्तक्षेप घेत वाद निवळला. यानंतर तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून बुलेटस्वार तरूणाविरूध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास पीएसआय जाधव हे करीत आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासणार
रामानंदनगर पोलिसांनी छेड काढणार्‍या बुलेटस्वार तरूणाची क्रं.एमएच.19.बीडब्ल्यु.3900 ही गाडी जप्त केली आहे. दरम्यान, तो तरूण कोण? यासाठी पोलिसांतर्फे डॉ. नारखेडे यांच्या दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे. त्या तपासातून बुलेटस्वार तरूण कोण हे निषन्न होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दोन वेगवेगळ्या गटातील पदाधिकारी पोलिस ठाण्याच्या आवारात भिडल्याने गोंधळ निर्माण होवून बघ्यांनी चांगलीच गर्दी केली होती.