वाघोली । पूर्व हवेली भागत बेकायदा वाळू उत्खनन मोठ्याप्रमाणावर चालू असल्यामुळे मंडल अधिकारी किशोर शिंगोटे यांनी भवरापूरच्या भागात बेकायदा चालु असलेली ‘वाळू चोरी’ उघड करून वाळू चोरी करणार्यांवर लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यावेळी गुन्ह्यातील वाहने अधिकृतपणे भवरापूरचे पोलीस पाटील चंद्रकात टिळेकर यांच्या ताब्यात देण्यात आली होती. सध्या मात्र गुन्ह्यातील वाहने गायब असतांनाही पोलीस पाटील वाहने ताब्यात असल्याचे सांगत असले तरी त्याठिकाणी वाहने ताब्यात नसल्यामुळे त्यांचा बनाव उघड झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा होऊ लागली आहे.
15 दिवसापूर्वी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली 3 ट्रॅक्टर, 3 पोकलेन मशीन एकूण 6 वाहने मंडल अधिकारी किशोर शिंगोटे यांनी पंचनामा करून तसेच वाहनांची ताबेपावती करून भवरापूरचे पोलीस पाटील चंद्रकांत टिळेकर यांच्या ताब्यात दिली होती. आता या वाळू चोरी प्रकाराचा तपास लोणी काळभोर पोलिसांकडून करण्यात येत आहे. या गुन्ह्याचे तपास अधिकारी महेंद्र चांदणे यांनी वारंवार सूचना करून देखीलही या गुन्ह्यातील वाहने पोलीस पाटील यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात जमा केली नसल्याचे कारवाईतील काही जप्त वाहने गायब असल्याचे उघड झाले आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत यातील एक पोकलेन वाहन आढळून आले असून लोणीकंद पोलिसांनी त्यांची नोंद घेतली आहे. तर महसूल विभागाने पोलीस पाटील याच्या घरी अचानक पाहणी करून पोलीस पाटलांच्या ताब्यातील काही वाहने गायब असल्याचा अहवाल नायब तहसीलदार यांना कळविला आहे.