पोलिस वाहन पायावरून गेल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी

0

जळगाव । पायावरून चक्क वाहतुक पोलिसांची गाडी गेल्याने विद्यार्थी जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास अ‍ॅग्लो उर्दू शाळा व महाविद्यालयाजवळ घडली. तरूणावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. अ‍ॅग्लो उर्दू विद्यालय व महाविद्यालयात अशपाक मोहम्मद मुस्ताक अली (वय-18, रा. मास्टर कॉलनी) हा विद्यार्थी 12 वीचे शिक्षण घेत आहे. बुधवारी दुपारी महाविद्यालय सुटल्याने अशपाक हा महाविद्यालयाबाहेर पडला. मात्र, काही तरी राहिल्याचे आठवल्याने तो पुन्हा दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास महाविद्यालयाकडे जात असतांना मागुन येणार्‍या वाहतुक पोलिसांच्या गाडीने त्याला धडक दिली.

यात तो खाली पडला आणि त्याच्या पायावरून वाहतुक पोलिसांच्या गाडीचे चाक गेले. पायावरून चाक गेल्याने अशपाक याच्या पायाला दुखापत होवून पाय सुजले. जवळच असलेल्या त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ जवळच असलेल्या खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. विद्यार्थी जखमी झाला म्हणून वाहतुक पोलिसांनीही खाजगी रूग्णालयात जावून विद्यार्थ्याची विचारपूस करीत त्याच्या उपचाराचा खर्च स्वत: करून देण्याचे सांगून तेथून निघून गेले. यानंतर अशपाक याच्या पायावर प्राथमिक उपचार करण्यात आले.