विविध शाळांमध्ये दिले स्वसंरक्षणाचे धडे
सोसायटीतील महिलांनाही मिळणार प्रशिक्षण
निगडी : महिला संरक्षण हा वर्तमानातील सर्वात गंभीर मुद्दा आहे. महिला छेडछाड, अत्याचार, बलात्कार, खून, धमकावणे, बळजबरी असे अनेक प्रकार समोर येत आहेत. प्रत्येक वेळी महिलांसोबत कोणीतरी असेलच असे नाही. तसेच प्रत्येक वेळी महिलांसोबत कोणीतरी असायलाच हवे, असेही नाही. समाजातील वाढत्या विकृतीमुळे महिलांनी स्वतःच स्वतःच्या संरक्षणासाठी तयार व्हायला हवे, असा नारा मागील काही वर्षांपासून देण्यात येत आहे. त्यादृष्टीने विविध सामाजिक संघटनांच्या आणि संस्थांच्या माध्यमातून महिला स्वसंरक्षणाचे दिले जात आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड आणि निगडी पोलिस स्थानकांनी डिफेन्स स्पोर्टस अकॅडमी यांच्यासोबत मिळून शहरातील विविध शाळांमध्ये महिला व विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. यामध्ये म्हाळसाकांत विद्यालय, विद्याभवन उच्च माध्यमिक शाळा यांसारख्या विविध शाळा सहभागी झाल्या आहेत. प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थिनींपर्यंत हे स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत.
सौदामिनींची संख्या 8000
निगडी येथील विद्याभवन उच्च माध्यमिक शाळेत इयत्ता सातवी ते दहावीच्या मुलींना आठ दिवसांचे सौदामिनी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचा समारोप बुधवारी झाला. पिंपरी-चिंचवड शहरात सौदामिनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींची संख्या सुमारे आठ हजार झाली आहे. शालेय विद्यार्थिनींसह सोसायट्यांमधील महिलांना देखील हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मुली तसेच महिलांना अनेकदा एकटे असताना कुठेही जाण्याची भिती वाटत असते. त्यामुळे अनेक सोसायटीतील महिलांनाही हे प्रशिक्षण दिले जात आहे. महिलांनी या प्रशिक्षणामुळे स्वतःचे संरक्षण स्वतः करण्यास समर्थ असतील.
न्यूनगंड कमी व आत्मविश्वास वाढतोे
कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट विजेते अरविंद मोरे मुलींना विविध शाळांमध्ये जाऊन सौदामिनी स्वसंरक्षण प्रशिक्षण देतात. याबाबत बोलताना अरविंद मोरे म्हणाले की, एखाद्या संकटात सापडल्यानंतर त्या संकटातून बाहेर पडण्याच्या विविध आयडीया या प्रशिक्षणात शिकविल्या जातात. यामुळे मुलींमधील न्यूनगंडाची भावना कमी होऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. बर्याचदा भीतीमुळे आत्मविश्वास कमी होतो. येणार्या संकटांची भीती कमी झाल्यास आत्मविश्वास वाढतो. महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांकडे पाहता, मुलींनी आता प्रतिकार करायला शिकायला हवे.