नवी दिल्ली : कोलकाता पोलीस आयुक्तांना सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना दिले आहेत. राजीव कुमार यांनी तपासात सहकार्य करावे, सीबीआयने देखील राजीव कुमार यांना अटक करु नये, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
चीट फंड गैरव्यवहारप्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांनाच तेथील पोलिसांनी गाडीत कोंबून पोलीस ठाण्यात आणल्याची घटना रविवारी घडली. लॉडन स्ट्रिटवर रंगलेल्या या नाट्याचे स्वरूप ममता बॅनर्जी विरुद्ध केंद्र सरकार असे होते. हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे.मंगळवारी सुप्रीम कोर्टात या याचिकेवर सुनावणी झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.