खासदार बारणेंची मुख्यमंत्र्याकडे मागणी
पिंपरी : पिंपरी येथील हिंदुस्थान अॅन्टीबायोटिक्स (एचए) कंपनी आर्थिक अडचणीत आहे. त्यासाठी या कंपनीची 56 एकर जागा विक्रीची परवानगी केंद्र सरकारने दिली. मात्र, अद्याप या जागेची विक्री होऊ शकलेली नाही. ही जागा पिंपरी-चिंचवड शहरासाठी होणार्या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी मध्यवर्ती असल्याने योग्य आहे. त्यामुळे आयुक्तालयासाठी राज्य शासनाने ही जागा घ्यावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. खासदार बारणे यांनी कंपनीच्या मुख्य व्यवस्थापक नीरजा सराफ यांच्यासोबत गुरुवारी बैठक घेतली. या वेळी त्यांच्या समवेत सुनील पाटसकर, अरूण बोर्हाडे आदी उपस्थित होते. या बैठकीत एचए कंपनीच्या जागेच्या विक्रीबाबत चर्चा झाली. ही जागा आणखी विक्री झालेली नसल्याने ती आयुक्तालयासाठी शासनाने घ्यावी, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
एचए कंपनीची जागा योग्य
खासदार बारणे यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी जागेचा शोधाशोध सुरू आहे. शहरात एचए कंपनीची जागा आयुक्तालयासाठी अतिशय योग्य आहे. तीच राज्य सरकारने विकत घ्यावी. त्या ठिकाणी पोलीस आयुक्तालयाबरोबर पोलीस वसाहत, पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि पोलीस खात्याशी निगडीत असलेले अनेक प्रकल्प राबवता येतील. त्यामुळे ही एकूण 56 एकर जागा राज्य सरकारने घेतल्यास एचए कंपनी आर्थिक संकटातुन बाहेर येईल आणि शहराच्या मध्यभागी पोलीस आयुक्तालय होईल. त्याबरोबर एचए कंपनीमधुन तयार होणारी औषधे ही राज्य शासनाच्या जिल्हा व ग्रामीण दवाखान्यांसाठी खरेदी करावीत.