पोलीस उपनिरिक्षकपदी निवडीबद्दल मोनिया गिरासेची घोड्यावरुन मिरवणूक

0

अलाने ग्रामस्थांकडून अनोखा सन्मान

ढोल-ताशांच्या गजर, सत्काराने गिरासे भारावल्या

जिल्ह्यात मुलींमध्ये एकमेव झाल्या परिक्षा उत्तीर्ण  

शिंदखेडा – तालुक्यतील अलाने येथील सर्वसामान्य कुटूंबातील मोनिया कोमलसिंग गिरासे ही नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झाली असून तिची पोलीस उपनिरिक्षक पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल अलाने ग्रामस्थांनी तिची गावातून घोड्यावरुन, ढोल ताशांच्या गजरात मिरवणुक काढून सत्कार करत अनोखा सन्मान केला आहे. जागतिक महिला दिनी पोलीस उपनिरिक्षक पदाची भेट व गावकर्‍याच्या अनोख्या सन्मानामुळे मोनिया गिरासे भारावल्या होत्या.

अलाने येथील छोटेशा खेडेगावातील अभ्यासाला पोषक वातावरण नसतानाही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मोनिया कोमलसिंग गिरासे या हिने पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली व ती उत्तीर्ण झाली. निवड झालेली मोनिया जिल्ह्यात मुलीमध्ये एकमेव ठरली आहे. तिचे प्राथमिक शिक्षण अलाने गावातच जि. प च्या शाळेत झाले माध्यमिक शिक्षण चिरणे येथील यशवंत विद्यालयात तर 12 वी पर्यंत एस.एस.व्ही.पी.एस ज्युनिअर कॉलेज शिंदखेडा व बीए हे तिथेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात झाले आहे.

सन्मानाने कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाअश्रू
सकाळी 10 वाजता गावावरून परत आली असता गावकर्‍यांनी तिला अलाने फाट्यावर महिला व पुरुषांनी 1 किलोमीटर जाऊन बॅन्ड वाजासह तिला घोड्यावर बसून वाजत गाजर गावात आणले. गावात प्रत्येक घरून तिचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. नंतर एका छोटेखानी कार्यक्रमात नातेवाईक, व पंचक्रोशीतील विविध मान्यवरांनी तिचा हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी स्टेजवर तिच्या सोबत तिची आई देवकोरबाई, वडील कोमलसिंग गिरासे हे होते. मुलीचा आदर सत्कार पाहून तिच्या आईवडिलांसह भाऊ संग्रामसिंग यांचे डोळ्यातून आनंदा अश्रू वाहू लागले त्या वेळी उपस्थितांचे डोळेही पाणावले होते

बापू तुमचा ‘भाऊ’ फौजदार झाला…
सत्काराला उत्तर देताना मोनिया म्हणाली की मला माझ्या वडिलांनी मुलगी न समजता मुलगा म्हणून सतत प्रोत्साहन दिले म्हणून हे शक्य झाले. इतर पालकांनीही मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी प्रोत्साहन करावे व मुलींनीही पालकांनी दिलेले स्वातंत्र्य आणि टाकलेला विश्‍वासाला तडा न जाऊ देता त्यांची स्वप्नपूर्ती करावी. पुढे बोलताना मोनिया म्हणाली, मला माझे वडीलांनी (बापू) कधीच मुलीच्या नावाने हाक मारली नाही. नेहमी भाऊ म्हणूनच मला हाक मारायचे असे सांगून वडिलांकडे बघून मोनिया म्हणाली की बापू तुमचा ‘भाऊ’ फौजदार झाला. त्या वेळी वडिलांचे डोळे पाणावले व आपल्या लेकीला त्यांनी कवेत घेतले.