जळगाव । गैरहजेरी दाखविल्याच्या कारणावरून पोलिस दलातील गुन्हे शाखा येथे दोन कर्मचार्यांनी जेष्ठ हजेरीमास्तरला शिवीगाळ करून दमदाटी केल्याची घटना रविवारी घडली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच स्थानिक गुन्हे शाखा विभागात दोन कर्मचार्यात हाणामारी होवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईला आठवडा उलटत नाही तोवर पुन्हा त्याच विभागात किरकोळ कारणावरून हजेरीमास्तरला शिवीगाळ करण्यात आली आहे.
एलसीबीत सहा दिवसानंतर पुन्हा वाद
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, 20 नोव्हेंबर रोजी दिलीप येवले यांना ईश्वर सोनवणे यांचा धक्का लागून गेल्या महिन्या भरापासुन धुसफुस सूरू असलेला वाद उफाळला आणि दोघांत हाणामारी झाली होती. याची दखल घेत दोघांना पोलिस अधीक्षकांनी निलंबीत करीत एकाला रावेर दुसर्याला चोपडा येथे बदली करण्यात आली. या घटनेला सहा दिवस उलटत नाही तोवर आज गुन्हेशाखेच्या ठाणे अंमलदार यांच्या खोलीत क्र (22) गैर हजेरीची नोंद घेतल्याच्या कारणावरुन शिवीगाळ दमदाटीचा प्रकार घडला आहे. प्राप्त माहितीनुसार नेहमीचे हजेरी मास्तर अशोक चौधरी गुन्हे तपासाला बाहेरगावी गेले असल्याने शिवाजी पाटील यांच्याकडे हजेरीची जबाबदारी होती.
पोलीस निरीक्षकांनी घेतली प्रकरणाची माहिती
आज 26/11 शहिद दिनाचा कार्यक्रम असतांना आणि नियमीत हजेरीला गैर हजर असणार्या कर्मचार्यांची नोंद घेण्याच्या सुचना निरीक्षक कुराडे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार दोन कर्मचार्यांच्या गैरहजेरीची नोंद घेण्यात आली. गैरहजेरीची नोंद घेतल्याची माहिती मिळताच दोघेही कार्यालयात धडकले. त्यांनी शिवाजी पाटील यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली, पाटील यांनी खोली सोडून 11 नंबरच्या खोलीत निघुन गेले. मात्र, दोघांनी तेथे येवुनही त्यांना शिवीगाळ केली. घटनेची माहिती मिळाल्यावर तत्काळ निरीक्षक सुनील कुराडे यांनी कार्यालय गाठले व घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.