पोलीस कर्मचाऱ्याची आजाराला कंटाळून आत्महत्या

0

पिंपरी-चिंचवड : कर्करोगासारख्या गंभीर आजाराला कंटाळून पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलीस लाईनमधील राहत्या घरी चंद्रकांत टिळेकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.वाकड पोलीस लाईनमध्ये ही घटना घडली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. या दुर्देवी घटनेमुळे पुणे पोलिसांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, चंद्रकांत टिळेकर चिखली पोलीस ठाण्यात हवालदारपदावर कार्यरत होते. त्यांना गेल्या काही काळापासून कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. आज (बुधवार) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पत्नी घराबाहेर जात असताना टिळेकर यांनी पत्नीला बाहेरून दरवाजाची कडी लावण्यास सांगितले. मुलं शाळा आणि कॉलेजमधून आल्यानंतर दरवाजा उघडतील असे ते म्हणाले होते. मात्र, पत्नी एक तासाने घरी परतल्यानंतर पतीने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. टिळेकर गेल्या काही काळापासून तोंडाच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याने कर्तव्यावर हजर राहू शकत नव्हते. गेल्या तीन महिन्यांपासून ते रजेवर होते. त्यामुळेच या आजाराच्या नैराश्यातूनच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेमुळे टिळेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.