हिंजवडी : दारूच्या नशेत भांडण करणा-या बेवड्याला जखम झाली. त्यामुळे चौकात कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचा-याने उपचारासाठी रुग्णालयात चल म्हटल्यावरून दोन बेवड्यांनी मिळून धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी साडेअकराच्या सुमारास हिंजवडी मधील शिवाजी चौकात घडली.
पोलीस नाईक शंकर सखाराम उत्तरेकर (वय 49) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनिलकुमार जोगाराम पांडे (वय 34, रा. विनोदेवस्ती, हिंजवडी. मूळ रा. पिथोडागड, जि. नैनिताल, उत्तराखंड), महेंद्र नरेश कुमार शर्मा (रा. विनोदेवस्ती, हिंजवडी. मूळ रा. बागलून, खाराबाजार, नेपाळ) अशी अटक करण्यात आलेल्या बेवड्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी मधील शिवाजी चौकात संग्राम वाईन शॉप समोर चारजण दारू पित होते. दारू पिल्यानंतर त्यांची एकमेकांमध्ये भांडण झाले. त्यातील दोघांनी अनिलकुमार याचा मोबाईल फोन नेला. परंतु अनिलकुमार त्याचा मोबाईल फोन महेंद्र कडे मागत होता. यावरून पुन्हा दोघांमध्ये भांडण सुरु झाले. यात अनिलकुमार याच्या डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे आजूबाजूला गर्दी झाली.
दरम्यान पोलीस नाईक शंकर उत्तरेकर शिवाजी चौकात पेट्रोलिंग करीत होते. गर्दीचे कारण तपासण्यासाठी ते घटनास्थळी गेले असता अनिलकुमार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसले. त्यामुळे उत्तरेकर यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात चल असे म्हटले. यावरून अनिलकुमार आणि महेंद्र या दोघांनी मिळून उत्तरेकर यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांची वर्दी फाडली. यावरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही बेवड्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक नंदराज गभाले तपास करीत आहेत.