भुसावळ। शहरातील जाममोहल्ला, अमरदीप टॉकीज चौकातील गस्त पोलीस चौकी म्हणून ओळख असलेल्या सुभाष पोलीस चौकीच्या स्लॅबचा काही भाग अचानक रात्री 12 वाजेनंतर कोसळला. मंगळवार 23 रोजी दुपारी 4 ते 5 या वेळात जोरदार पाऊस झाला त्यामुळे जुन्या आणि जिर्ण पोलीस चौकीच्या स्लॅबचा काही भाग रात्री अचानक कोसळला.
दुरुस्तीकडे दुर्लक्ष
दरम्यान या पोलीस चौकीचा समोरील कठडा काही दिवसांपासून जिर्ण झाला होता. त्याला तडा देखील गेल्या होत्या. याठिकाणी नियमितपणे पोलीस कर्मचारी येऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पावसाच्या वेगाने हा कठडा अचानकपणे खाली कोसळला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. सुदैवाने ती पोलीस चौकी रात्रीच्या वेळेस बंद होती. बाहेर कोणीही नव्हते त्यामुळे जिवितहानी टळली.