विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल
मुंबई : आझाद मैदानात नाणार प्रकल्प बाधितांचे सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती आणि वृत्त संकलित करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराची कॉलर पकडून पोलिसांनीच दमदाटी केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. या प्रकारावरुन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. चौथ्या स्तंभाला आता पोलीस दमदाटी करीत आहेत. आपण पोलीस राजच्या दिशेने चाललोय का, असा सवाल विखे पाटील यांनी केला. दरम्यान संबंधित पोलीस उपनिरीक्षकाच्या निलंबनाची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. तर सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
पत्रकारांना दमदाटी करा, अशा सूचना सरकारने पोलिसांना दिल्या आहेत का, असे विखेंनी विचारले. नाणार प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली जात आहे. अशा प्रकाराची तक्रार घेण्यास पोलीस नकार देतात, असेही विखे म्हणाले. नाणारचे प्रकल्पग्रस्त आंदोलनाला बसले आहेत. तो प्रकल्प होणार नाही, असे उद्योगमंत्री सांगतात. लोकांना विश्वासात घेऊन प्रकल्प आणू, असे मुख्यमंत्री म्हणतात. एका पक्षाचे आमदार आज राजीनामे देतो, उद्या राजीनामे देतो असे म्हणतात. त्या राजीनाम्यांचे काय झाले तेच कळत नाही, असा टोलाही विखेनी शिवसेनेला लगावला.
हा टोला सेनेच्या जिव्हारी लागला. विरोधी पक्षाच्या नेत्यांना पोलिसांबद्दल बोलायचे आहे की नाणारबद्दल? एकावेळी एक मुद्दा घ्या, असे प्रत्युत्तर सेना आमदारांनी दिले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनीही पोलिसी दंडेलीचा निषेध केला. या राज्यात पत्रकार सुरक्षित नाहीत अशी टीका त्यांनी केली.
जमीन अधिग्रहण स्थगित
विखे आणि आव्हाड यांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. राजीनाम्यांचं बोलू नका. सेना आणि आम्ही सोबत आहोत, ही तुमची सल आहे. तुमच्यासाठी आता काही राहिलेले नाही. तुम्ही अजून १० ते १५ वर्ष तिथेच बसणार आहात, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. नाणारसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर जमीन अधिग्रहणाला स्थगिती देण्यात आली आहे. कोणावरही कसलीही सक्ती करण्यात आलेली नाही. फसवणुकीसंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास ती दाखल करुन घेतली जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.