पोलीस मित्र होवून समाजसेवा करा

0

नीलोत्पल ; स्थापनादिनानिमित्त पोलीस मित्रांना मार्गदर्शन

भुसावळ : आपण जरी पोलीस होवून समाजाची सेवा करू शकत नसलो तरी पोलीस मित्र होऊन समाजाची सेवा करावी, त्यामुळे आपणास समाजात प्रतिष्ठा मिळू शकते, असे प्रतिपादन सहाय्यक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केले. बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस मित्रांच्या आयोजीत बैठकीत ते
बोलत होते.

पोलीस मित्रांना काठी-शिटीचे वाटप
उपस्थित पोलीस मित्रांना सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते काठी, शिटीचे वाटप करण्यात आले. नीलोत्पल म्हणाले की, समाजसेवा वेगवेगळ्या क्षेत्रातून करता येते मात्र पोलीस हा काहीही झाले तरी सर्वात पहिले धावून जात असतो. प्रत्येकाला पोलीस बनायचे वाटत असले तरी अनेकांना ते शक्य होत नाही. त्यामुळे पोलीस मित्र होऊन समाजाची सेवा करणे गरजेचे आहे. पोलीस मित्रांनी युवा शक्ती ही मोबाईलच्या आहारी जात आहे, त्यामुळे मोबाईल वापराला आळा घाला, शिक्षणात लक्ष घाला, चांगले शिक्षण घेऊन नोकरी करा, उच्च पदस्थ अधिकारी बनून देशसेवा करा, रात्रीच्या वेळी चोर्‍यांचे प्रमाण वाढत असल्याने युवकांनी रात्री पोलिसांसोबत गस्त करून आपला परीसर सुरक्षित कसा राहील याचा विचार करा, रात्री हातात काठी, तोंडात शिटी ठेवा, कोणी संशयीत वाटल्यास त्याची चौकशी करा, अथवा पोलिसांना माहिती द्या, पोलीस तत्काळ येऊन संबंधिताची चौकशी करतील, युवकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नीलोत्पल यांनी केले. बाजारपेठचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी मनोगत व्यक्त केले. हवालदार छोटू वैद्य, नंदू सोनवणे, बाळू पाटील यांनी सहकार्य केले.