पोलीस व नक्षलवाद्यांच्या चकमकीत २ जवान जखमी

0

खूंटी/रांची – खूंटी जिल्ह्याच्याजवळ असलेल्या सरायकेला सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये तुफान चकमक सुरू आहे. चकमकीत कोब्रा बटालियनचे २ जवान जखमी झाले आहेत. दरम्यान सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चकमकीत अनेक जवान जखमी झाल्याची माहिती असून, पोलिसांनी मात्र या माहितीला दुजोरा दिलेला नाही. सरायकेला जिल्हा पोलिसांचे एक पथक नक्षलवाद्यांच्या विरोधातील अभियानासाठी निघाले होते. त्याचदरम्यान नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. जवानांनी देखील त्याला तत्काळ प्रत्युत्तर देत कारवाई सुरू केली.

रुग्णालयात दाखल

जखमी जवानांना तेथून बाहेर काढून उपचारासाठी रांचीला हलवण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहे. खूंटीमध्ये देखील वैद्यकीय पथक तयार ठेवण्यात आले आहे. हेलीकॉप्टर देखील तयार ठेवण्यात आले आहे. जवानांना चकमकीच्या ठिकाणापासून बाहेर काढताच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जाईल. खूंटीचे पोलीस अधीक्षक अश्विनी कुमार सिन्हा यांनी सांगितले, की त्यांचे जवान देखील चकमकीच्या ठिकाणाकडे रवाना झाले आहेत. पोलीस मुख्यालयाकडून त्यांना रुग्णवाहिका तयार ठेवण्यास सांगितले आहे.

जखमींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

यावरून चकमकीत अनेक जवान जखमी झाल्याचा अंदाज लावला जात आहे. खूंटी पोलीस देखील सरायकेला पोलिसांच्या मदतीसाठी घटनास्थळावर पोहचले आहेत. यानंतर नक्षलवादी हळूहळू जंगलाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न करत आहेत. झारखंड पोलिसांचे प्रवक्ता पोलीस महासंचालक आशीष बत्रा यांनी सांगितले, की ही भीषण चकमक सकाळपासून सुरू आहे. या चकमकीत जिल्हा पोलीस, सीआरपीएफ कोब्राचे जवान सहभागी आहेत. पोलिसाकडून जखमींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित चकमक कुख्यात नक्षलवादी महाराज प्रमाणिक याच्या तुकडीसोबत सुरू आहे. सरायकेला पोलिसांनी ३ दिवसांपूर्वीच महाराज प्रमाणिक याच्या गावी जाऊन एक रात्र मुक्काम केला होता. पोलिसांनी तेथे आत्मसमर्पणाबाबत चर्चा केली होती.