पोलीस संरक्षणात जबरदस्तीने बांधकामांना नोटिसा

0

पिंपरी – रहाटणी येथील बारा मीटर डीपी रस्त्याच्या आरक्षित जागेतील बांधकामांना महापालिकेच्यावतीने गुरुवारी सकाळपासून नोटिसा बजावण्यात येते आहेत. मात्र, या रस्त्याला येथील नागरिकांचा विरोध आहे. तरी देखील पोलीस संरक्षणात जबरदस्तीने आम्हाला नोटिसा दिल्या जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने रहाटणी येथे महापालिकेच्या विकास आराखड्यातील 12 मीटर डीपी रस्ता प्रस्तावित आहे. रहाटणीतील नखाते चौक ते कोकणे चौक याला जोडणारा हा अंतर्गंत रस्ता आहे. या रस्त्यामुळे या भागात 1985 सालापासून 50 हून अधिक घरे आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांचा या रस्त्याला विरोध आहे. त्यांनी 12 मीटर ऐवजी हा रस्ता 9 मीटर करावा, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, ते रजेवर गेले असताना महापालिकेच्या बांधकाम परवाना व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने आज सकाळपासून त्यांना नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, येथील नागरिकांना पोलिसांच्या मदतीने जबरदस्तीने नोटिसा घ्यायला भाग पाडले जात आहे. नागरिकांना रस्त्यावर आणण्याचा हा सगळा डाव असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नोटिसा स्वीकारण्यावरून नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. तसेच, या प्रकरणी नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंतीही केली आहे. महापालिकेचे कार्यकारी अभियंता मकरंद निकम म्हणाले की, हा महापालिकेच्या डीपी रस्ता आहे. ही रस्त्याच्या आरक्षित जागेवर झालेली अनधिकृत बांधकामे आहेत. तेथील वाहतुकीसाठी हा रस्ता विकसित केला जात आहेत. त्यावर नियमाप्रमाणे व कायदेशीपणे कार्यवाही सुरू आहे.