पोळा सणालाच दुर्घटना : बैलजोडी धुताना तलावात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू

पोळा सणालाच दुर्घटना : बैलजोडी धुताना तलावात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू

A farmer of Lonwadi, who had gone to wash his bullocks, drowned in the lake बोदवड : तालुक्यातील लोणवाडी येथील विनोद वसंत चौधरी (42) या शेतकर्‍याचा बैल धुण्यासाठी तलावात गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. शुक्रवार, 26 रोजी पोळा सणालाच घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

सणावर पसरले दुखाःचे सावट
पोळा सणानिमित्त शेतकरी विनोद चौधरी हे शुक्रवारी पिंपळगाव देवी रस्त्यानजीक असलेल्या बोरलोन या ठिकाणी बैलजोडी धुण्यासाठी गेले असता अचानक पाण्यात बैल बिथरला व त्याचवेळी शेतकर्‍याचा हातातील दोर न सुटल्याने ते गाळात रुतले व नंतर पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. तत्पूर्वी अत्यवस्थ अवस्थेत बोदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू ओढवला. शेतकर्‍याच्या मृत्यूने लोणवाडी गावावर ऐन पोळ्याच्या दिवशी दुःखाचे सावट पसरली. मयत विनोद वसंत चौधरी यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.