निवीदा रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवा – रविंद्र शिंदे
जळगाव – ग्रामीण भागातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार पुरविणार्या ठेकेदाराने दिलेले दर आणि बाजार समितीचे दर यात मोठी तफावत आढळुन आल्याने ही निवीदा प्रक्रिया रद्द करून नव्याने प्रक्रिया राबविण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. दरम्यान बाजार समिती आणि पुरवठादाराने दिलेल्या दरात मोठी तफावत असतांनाही हा ठेका मंजूर करणार्या अधिकार्यांची चौकशी करावी अशी मागणी देखिल करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार पुरविण्यासंदर्भात ई-निवीदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेत शिक्षण विभागातील अधिकार्यांनी स्वत:च्या आणि ठेकेदाराच्या फायद्यासाठी गुणिना कमर्शिअल्स,प्रा. लि. या कंपनीच्या निवीदाधारकाची पुरवठादार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडुन दर मागविण्यात आले होते. निवीदाधारकाने दिलेले दर आणि बाजार समित्यांचे दर यात मोठी तफावत आढळुन आली. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातही भ्रष्टाचाराची संधी शोधणार्या अधिकारी व ठेकेदाराचे हे कटकारस्थान उघड झाले आहे. चवळी, मटकी, मुग, मुगडाळ, मिरची पावडर, हरभरा, मसुर डाळ, तुरडाळ या वस्तुंपोटी किलोमागे तब्बल 40 ते 100 रूपयांचा नफा कमविण्याच्या उद्देश संबंधितांचा दिसून येत आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी पुराव्यानिशी हा प्रकार उघड केला आहे. या योजनेत नफा कमविणार्या कंत्राटदारांची साखळीच असुन त्यांच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई होत नाही. दरम्यान याबाबत रविंद्र शिंदे यांनी आज शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांकडे लेखी तक्रार करून ठेकेदाराची निवीदा रद्द करून नव्याने निवीदा प्रक्रिया राबविण्याची मागणी केली आहे. तसेच ज्या अधिकार्यांचा यात सहभाग आहे त्यांची देखिल चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तर न्यायालयात जाणार
शालेय पोषण आहारात गैरप्रकार करणार्यांविरूध्द कारवाई न झाल्यास न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया रविंद्र शिंदे यांनी दिली.