पोषण आहारातील घोटाळ्याच्या चौकशी करणार्‍या अधिकार्‍याचा सत्कार

0

यावलच्या साने गुरूजी विद्यालयातील प्रकार : प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप

यावल- शहरातील साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पोषण आहारात अळ्या व कीडे आढळून आल्यानंतर गुरुवारी चौकशी करण्यासाठी आलेल्या पोषण आहार अधीक्षक गणेश शिवदे यांचा शाळा प्रशासनाने सत्कार केल्याने व त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त होत आहे. गैरप्रकार दाबण्यासाठी तर हे घडले नाही ना? अशी शंका पालक उपस्थित करीत आहेत.

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ
बुधवारी पालिकेच्या शिक्षण समितीच्या सदस्या नगरसेविका रूख्माबाई भालेराव-महाजन, गटनेता राकेश कोलते यांनी शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी आणलेल्या धान्याची पाहणी केली असता धान्यात अळ्या व कीडे आढळले होेत. शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यानंतर गुरूवारी शालेय पोषण आहार अधीक्षक गणेश शिवदे यांनी शाळेच्या संपुर्ण धान्य साठ्याची तपासणी केली. एक क्विंटल तांदळात मोठ्या प्रमाणात अळ्या व किडे आढळून आले. विद्यार्थ्यांच्या आहाराच्या धान्याकडे अशाप्रकारे दुर्लक्ष केल्याप्रकरणी त्यांनी मुख्याध्यापक टी. सी. बोरोले यांना ताबडतोब नोटीस बजावली. तर हा जुना साठा असल्याने त्यात अळ्या व धनुर कीड लागल्याचे मुख्यध्यापकांनी सांगितले. यावर नगरसेविका रख्माबाई भालेराव यांनी हा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अतिरिक्त साठ्याची चौकशी
दरम्यान पालिकेच्या शिक्षण समितीने या शाळेत विद्यार्थी संख्येपेक्षा अधिक साठा असल्याचा आरोप केला आहे. यावर शालेय पोषण आहार अधिक्षक गणेश शिवदे यांनी सांगितले की, त्या गोदामास सील करण्यात आले आहे. मुख्याध्यापकांना नोटीस बजावण्यात आली असून संपूर्ण साठ्याची तपासणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले.