पोषण आहार योजनेचे अनुदान लवकरच!

0

पुणे । शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पोषण आहारासाठी अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पुरवठादाराचा करार संपुष्टात आल्याने विद्यार्थ्यांना शालेयस्तरावरून पोषण आहारासाठी यंत्रणा राबविण्यात येत होती. मात्र, आता नवीन पुरवठादाराची नेमणूक झाली असून लवकरच अन्नधान्य पुरवठा वितरीत करण्यात येणार आहे.

शालेय पोषण आहार या केंद्रसरकार पुरस्कृत योजनेंतर्गत जिल्ह्यातील 5 हजार 463 शाळांतील 7 लाख 62 हजार 852 विद्यार्थ्यांना आहार पुरविला जातो. ग्रामीण भागातील शाळांना पोषण आहाराच्या अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी पुरवठादाराबरोबर करार करण्यात आला आहे. हा करार जून 2017 मध्ये संपुष्टात आला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालकांच्या निर्देशानुसार ऑगस्ट 2017 पासून शाळास्तरावर अन्न शिजवणारी यंत्रणा पोषण आहारासाठी लागणारा माल खरेदी करून विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देत होती. दरम्यान, सन 2017-2018 साठी शिक्षण संचालनालयाद्वारे निविदा प्रक्रिया झाली असून 29 नोव्हेंबर पासून नवीन पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

आठ दिवसात मिळणार अनुदान
इंधन भाजीपाला, स्वयंपाकी यांचे सप्टेंबर अखेरचे मानधन वितरीत केले असून शाळास्तरावर बचतगटांनी खरेदी केलेल्या मालाचे अनुदान व इतर सर्व अनुदान पुढील आठ दिवसात तालुकास्तरावर वितरीत केले जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि शिक्षण आणि अर्थ समितीचे सभापती विवेक वळसेपाटील यांनी दिली.