पोस्टमनची भरती प्रक्रिया सरकारने करावी

0

कर्मचारी संघटनांनी केली मागणी

पिंपरीः नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज आणि ऑल इंडिया पोस्ट व एम्प्लॉईज पोस्टमन व एम.टी.एस या संघटनांनी महाराष्ट्रभर संप पुकारला आहे. राज्यातील बेरोजगारांना केंद्र सरकारी नोकरी मिळेल आणि राज्यातील नागरिकांनाही सेवा देता येईल. यादृष्टीने ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर करावी. राज्यभर गेल्या 7 ते 8 वर्षांपासून भरती झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक ऑफिसमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच कामगार शिल्लक आहेत. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 40 ते 45 टक्के पोस्टमन व एमटीएस कर्मचारी यांच्या जागा रिक्त आहेत. सर्वच ऑफिसमध्ये राहिलेल्या कामगारांवर कामाचा बोजा पडत आहे. पोस्टमन कर्मचारी नागरिकांना व्यवस्थित सुविधा पुरवू शकत नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर सर्व प्रकारच्या पोस्टमन व एमटीएसच्या रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी पुणे शहर पूर्व विभागाचे सचिव डी. आर. देवकर यांनी व संघटनांनी सरकारकडे केली आहे.

20 जुलैपासून संपावर
संपूर्ण महाराष्ट्रात दि. 20 जुलैपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपामध्ये फक्त मराठी भरती करा ही एकच मागणी आहे. मुंबई व नवी मुंबई येथे रोजंदारीवर 288 प्रमाणे पोस्टमन घेत आहेत. तर मग पुण्यासारख्या ठिकाणी का नाही असा सवाल ही त्यांनी केला आहे. भरतीमुळे राज्यातील बेरोजगारांना केंद्र सरकारी नोकरी मिळेल आणि राज्यातील नागरिकांनाही सेवा देता येईल. त्यासाठी ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी. हीच सर्व संघटनांमार्फत सरकारला मागणी असल्याची माहिती पुणे शहर पूर्व विभागाचे सचिव डी. आर. देवकर यांनी दिली.