प्रकल्पांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी

0

शहादा । तालुक्यातील चार लघुसिंचन प्रकल्पाची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे तालुक्यातील आठ सिंचन प्रकल्पापैकी चार प्रकल्पाची दुरावस्था झाली आहे. तालुक्यातील दुधखेडा लंगडी भवानी कोंढावळ व शहादा लघुसिंचन प्रकल्पाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. हे प्रकल्प ग्रामीण भागासाठी महत्वपूर्ण आहेत मात्र या सिंचन प्रकल्पाना सातत्याने पाण्याची गळती सुरू असते त्यात सर्वाधिक गळती दुधखेडा प्रकल्पातून होत आहे.

मुख्य बांधाचे नूतनीकरण करा
परिसरातील नागरिकांनी लघुसिंचन विभागाकडे वेळोवेळी तक्रार केल्याने तात्पुरती दुरुस्ती केली होती. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या चारही सिंचनप्रकल्पाची दुरूस्ती करून मुख्य बांधाचे नूतनीकरण करावे. दगडाचे नवीन पिचींग करण्यात यावे म्हणजे पावसाळ्यात गळतीच्या धोका निर्माण होणार नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या तीन चार वर्षापूर्वी दुधखेडा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात ठेका पद्धतीने मत्स्यउद्योग केला जात होता. मात्र गेल्या तीन वर्षापासून प्रकल्पात पाण्याचा जलसाठा शिल्लक रहात नसल्याने मासेमारी उद्योग बंद झाला आहे. शिवाय या प्रकल्पामध्ये मोठ्याप्रमाणात गाळ साचत चालला आहे. त्यामुळे तेथील गाळ काढणे गरजेचे आहे.

संबधित विभागाचे दुर्लक्ष
कोणताही अधिकारी या प्रकल्पाची स्थिती पाहण्यासाठी फिरकला नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले आहे. एकीकडे शासन जलयुक्त शिवार योजनेचा माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे तसेच शेतकर्‍यांच्या जमीनी ओलिताखाली आणण्याचा दावा करीत आहेत पण दुसर्‍या बाजूला शहादा तालुक्यातील चार प्रकल्पाची दुरावस्था झाली असताना बघ्यांची भूमिका घेतली आहे. शहादा तालुक्यातील दुधखेडा धरणाला पाण्याची गळती सुरु झाल्यानंतर आ. उदेसिंग पाडवी यांनी प्रत्यक्ष भेट देउन पाहणी केली होती व अधिकार्‍यांना सूचना दिल्या होत्या. मात्र अद्यापही परिस्थिती जैसे थे आहे. सर्व प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी शासनाने निधी उपलब्ध करण्याची मागणी आ. उदेसिंग पाडवी यांनी केली होती.