ऑकलंड । जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानावर असलेल्या एच. एस. प्रणॉयसहित भारताच्या चौघा बॅडमिंटनपटूंनी बुधवारी आपापले सामने जिंकत न्यूझीलंड ग्रापी गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकून सलग दुसर्या विजेतेपदासाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या चौथ्या मानांकित प्रणॉयने पुरुष एकेरीच्या दुसर्या फेरीत इंडोनेशियाच्या फिर्मन अब्दुल खोलिकचा 23-21, 21-18 असा पराभव केला. तिसर्या फेरीत प्रणॉयचा सामना 10 व्या मानांकित हाँगकाँगच्या वेई नानशी होईल. अन्य लढतीत राष्ट्रकुल विजेत्या पारुपल्ली कश्यपने स्थानिक असलेल्या ऑस्कर गुआला एकतर्फी सामन्यात 21-9, 21-8 असे हरवले. पुढच्या फेरीत कश्यपला भारताच्याच सातव्या मानांकित सौरभ वर्माचा सामना करावा लागणार आहे.
सौरभने आगेकूच करताना इंडोनेशियाच्या हेन्रीको खो विबोवोवर 21-16, 21-16 असा विजय मिळवला. याशिवाय सिरील वर्माने दुसर्या फेरीत विजय मिळवताना इंडोनेशियाच्या सापुत्रा विक्की अंगाचे आव्हान 21-14, 21-16 असे संपुष्टात आणले. उपांत्यपूर्व फेरीत सिरिलचा सामना चायनिज तैपईच्या चिया हंग लु शी होईल. इतर भारतीय खेळाडूंमध्ये प्रतुल जोशी, निरज वसिष्ठ आणि साहिल सिपानीला पराभवाचा सामना करावा लागला. अव्वल मानांकित चायनिज तैपईच्या जू वेई वाँगने 21-13, 24-22 असे हरवले. न्यूझीलंडच्या अॅन्थनी जोएने 21-16, 21-13 निरजवर विजय मिळवला. साहिल चायनिज तैपईच्या लिन यू सीनकडून 21-9, 21-8 असा पराभूत झाला. महिलांच्या दुहेरीच्या लढतीत संयोगिता घोरपडे आणि प्राजक्ता सावंत या भारतीय जोडीला दुसर्या फेरीत चौथ्या फेरीत जपानच्या आयूका साकूरामोतो आणि यूकिको ताकाहाता या जोडीकडून 15-21, 18-21 असा पराभव पत्करावा लागला.