प्रताप गडाच्या तटबंदीचा दगड पडल्याने एकाचा मृत्यू

0

सातारा-किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे कुटूंबीयांसह आलेल्या १३ वर्षांच्या मुलाच्या डोक्यात तटबंदीचा दगड पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ओम प्रकाश पाटील (रा. उफाळेवाडी, ता. तासगाव, जि सांगली) असे या मुलाचे नाव आहे. शंभर ते दिडशे फुट उंचावरून दगडी तटबंदीवर माकडांचा कळप खेळत असताना एका माकडाचा धक्का लागून तटबंदीवरून निसटलेला मोठा दगड डोक्यावर पडला. या अपघातात ओमचे डोके फुटले व तो जागीच ठार झाला.

माकडे खेळत असतांना दगड पडला 

प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले प्रकाश पाटील हे मुलांच्या शाळेला सुट्टी लागली म्हणून कुटूबीयांसह महाबळेश्वरच्या सहलीवर आले होते. औंध व सज्जनगडाला भेट देवून सोमवारी सकाळी ते महाबळेश्वरला पोहोचले. ऑर्थरसीट व क्षेत्र महाबळेश्वर पाहून दुपारी किल्ले प्रतापगडावर पोहोचले. पायऱ्या चढून प्रतापगडावर जात असताना ही घटना घडली. प्रतापगडावर भुईमुगाच्या शेंगा विकण्यासाठी स्थानिक महिला बसत असतात या शेंगा हातात घेवून काही पर्यटक शेंगा माकडांना खाण्यास देतात. येथे मोठया प्रमाणावर माकडे जमा होतात. प्रतापगडाच्या पायऱ्या चढत असताना तटबंदीवरील दगडाला माकडांचा धक्का लागला व तो ओमच्या डोक्यावर पडला. या अपघातात ओमचे डोके फुटले, तो जागीच कोसळला.

पाटील कुटूंबाचा हा आक्रोश ऐकून उपस्थितांचे मन सुन्न झाले होते. वडीलही ओमची अवस्था पाहून कोसळले. पर्यटक व स्थानिक नागरिक हे पाटील कुटंबाच्या मदतीला धावले. त्यांनी तातडीने ओमला कुंभरोशी येथील रूग्णालयात दाखल केले. परंतु तो जागीच ठार झाल्याचे वैदयकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.